धुळे जिल्ह्यात आधारकार्ड नसल्यास लाभार्थ्यांना मिळणार नाही धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 05:13 PM2018-02-27T17:13:37+5:302018-02-27T17:13:37+5:30
१ एप्रिलपासून कार्यवाही : ग्रामीण भागात ‘पॉस’ मशीनच्या अडचणी कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील स्वस्त रेशन धान्य दुकानांमध्ये १ एप्रिलपासून लाभार्थ्यांकडे आधारकार्ड नसेल तर त्यांना धान्य मिळणार नाही, अशी माहिती साहाय्यक पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानांना वाटप करण्यात आलेल्या पॉस मशीनला ग्रामीण भागात प्रचंड अडचणी येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
धान्य मिळण्यासाठी आधारकार्ड लागणारच
जिल्ह्यात एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या ३ लाख ८७ हजार इतकी आहे. परंतु, अनेक लाभार्थ्यांनी त्यांचे आधारकार्ड शिधापत्रिकेशी लिकिंग केलेले नाही. अशा परिस्थितीतही गेल्यावर्षापासून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरू होते. परंतु, आता शासन आदेशानुसार १ एप्रिलनंतर ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे आधारकार्ड लिकिंग केलेले नाही. किंवा त्यांच्याकडे आधारकार्ड नाही. अशा लाभर्थ्यांना धान्य दिले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे.
लाभार्थ्यांना शिधापत्रिकेची पोर्टेबिलिटी करता येणार
शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना कोणत्याही रेशन धान्य दुकानांमध्ये त्यांच्या शिधापत्रिका वापरता येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या शिधापत्रिकेची पोर्टेबिलिटी करावी लागणार आहे. १ एप्रिलनंतर या प्रक्रियेला जिल्ह्यात प्रारंभ होणार आहे, अशी माहिती साहाय्यक पुरवठा अधिकारी भामरे यांनी सांगितले आहे.