धुळे तालुक्यातील नवे कोठारे येथील शिक्षकाची बदली रद्द न झाल्यास १५ पासून शाळा बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:09 AM2018-06-14T11:09:36+5:302018-06-14T11:09:36+5:30
ग्रामस्थांनी घेतला निर्णय, मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे : तालुक्यातील नवे कोठारे येथील जि.प.शिक्षक विजय पाटील यांची बदली रद्द करावी, अन्यथा १५ जून पासून शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यासदंर्भात जिल्हा परिषदेचे सीईओ गंगाथरन देवराजन व प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना निवेदन दिले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांपासून नवेकोठारे येथील जि.प.शाळेचा विकास झालेला नाही. पूर्वी या शाळेची पटसंख्या ५६ होती.
दोन वर्षांपूर्वी या शाळेत विजय पाटील हे शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यांनी शाळेची मोठ्या प्रमाणात प्रगती केली. या शाळेची पटसंख्या आता ११७ एवढी झालेली आहे.
विजय पाटील यांची नुकतीच साक्री तालुक्यातील खोबरे या गावी बदली झालेली आहे. त्यांची बदली प्रशासनाने रद्द करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. १५ जूनपासून शाळा सुरू होत आहे. तोपर्यंत पाटील यांची बदली रद्द न झाल्यास, शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. निवेदनावर दिलीप दगडे, सोमनाथ गोयकर, नामदेव कोळपे, वसंत वाकसे, खंडू दगडे, भीमा सरगर, तुळशीराम गोयकर, पुना कोळपे, चिंधा कलगुंडे आदींची नावे आहेत.