शंका असल्यास आयोगाचे मार्गदर्शन घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:38 PM2018-11-25T21:38:30+5:302018-11-25T21:39:11+5:30
महापालिका : मुख्य निवडणूक निरीक्षक सौरभ विजय यांच्या सूचना, परस्पर निर्णय नको
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपा निवडणूक प्रक्रियेत काही शंका असल्यास राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घ्यावे, परस्पर कुठलाही निर्णय घेऊ नये, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक सौरभ विजय यांनी दिल्या़
मनपा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा मुख्य निवडणूक निरीक्षक सौरभ विजय यांनी घेतला़ त्यावेळी ते बोलत होते़ बैठकीस, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, निवडणूक निरीक्षक गोरक्ष गाडिलकर व दिनेश जगदाळे उपस्थित होते़ बैठकीच्या प्रारंभी निवडणुकीबाबत आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पीपीटीद्वारे दिली. तसेच त्याबाबत विवेचन केले़ निवडणुकीची प्रक्रिया व कार्यवाही नि:पक्षपातीपणे पार पाडावी व मतदारांना अडचणी येणार नाही याची पुरेपुर दक्षता घ्यावी, मागील निवडणूक काळातील अनुभव लक्षात घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक सौरभ विजय यांनी या बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आचारसंहितेची कार्यवाही नि:पक्ष व प्रभावीपणे करावी, रात्रीच्या वेळी भरारी पथकांनी गस्त ठेवावी, प्रत्येक प्रसंगाचे चित्रिकरण करावे, कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास वरिष्ठांना संपर्क करावा, निवडणूक यंत्रणेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मार्गदर्शन केले़ बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडणीस, विक्रम बांदल, शरद पवार, संजय गायकवाड, गणेश मिसाळ, रामसिंग सुलाने, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्षप्रमुख राजेंद्र पाटील, हिशेब तपासणी पथक प्रमुख बी.डी. पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, उपायुक्त रविंद्र जाधव, शांताराम गोसावी, सहायक आयुक्त नारायण सोनार व कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते़
बैठकीनंतर निरीक्षक सौरभ विजय यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची पाहणी केली़