विरोधात बोलाल तर जेलची हवा खाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:39 AM2021-09-26T04:39:37+5:302021-09-26T04:39:37+5:30
धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अनेक ठिकाणी भाषणे झालीत. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांनीदेखील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मात्र मी त्यांना ...
धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अनेक ठिकाणी भाषणे झालीत. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांनीदेखील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मात्र मी त्यांना आधीच सांगितले, बाबांनो टीका करा, मात्र मी करतोय म्हणून तुम्ही करू नका, भाजप सरकारविरोधात बोलाल तर तुम्हीदेखील भुजबळ होऊन जेलची हवा खाल, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी जि.प. सदस्य किरण पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, एन.सी. पाटील, तेजस गोटे, डॉ. जितेंद्र ठाकूर आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
एकाही महिलेने माथा टेकला नाही.
गणेशोत्सवात पुण्यातील भिडे बागेतील गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणासाठी शेकडो महिला जमल्या. महिलांनी शिकावे, पुढे जावे, याला विरोध नाही. मात्र त्याच भिडे बागेत काही अंतरावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुुले यांनी मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या ठिकाणी जाऊन एकाही महिलेला माथा टेकावा असं वाटू नये का? राष्ट्रवादी पक्ष सतत ओबीसी, दलित, वंचितांच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेत आहे. भाजपकडे सत्ता हातात असताना त्यांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिले नाही. मात्र सत्ता गेल्यावर ओबीसींच्या आरक्षणासाठी आक्रमक होतात. भाजप सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ५६ हजार ओबीसींच्या जागा धोक्यात आल्या आहेत.
भाजप सरकार केवळ विकण्याचे काम करीत आहे
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना अनेक विकासकामे केंद्रात व राज्यात झालीत. मात्र जे आमच्या कार्यकाळात झाले ते विकण्याचे काम या सरकारकडून केेले जात आहे. त्यामुळे आता सांगू नका आपण काय केले आहे. कारण सांगण्यासारखे काहीच शिल्लक नाही. सर्व काही या सरकारने विकून टाकले आहे, अशीही टीका राज्यमंत्री भुजबळ यांनी केली.
हो आहे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एकाच जातीचा विचार केला नाही. त्यांनी सर्व जातींचा विचार करून भारतीय सविधान लिहिले. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला डॉक्टर, वकील, इंजिनीअर तसेच विविध उच्च पदांवर काम करीत आहेत. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले. संविधानाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. मात्र असे असतानादेखील केवळ आम्ही सांगू तीच पूर्व दिशा. सत्तेवर बसण्यासाठी ईडीचा धाक दाखवून हे सरकार सत्तेवर बसले होते. या सरकारची हुकूमशाही कमी करण्यासाठी तिन्ही पक्ष मतभेद दूर ठेवून एकत्र आलेत.