धुळे मनपात बेकायदेशीर भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:01 PM2020-01-02T22:01:39+5:302020-01-02T22:02:11+5:30
स्थायी समिती : तत्कालीन आयुक्तांची विभागीय चौकशी?
धुळे : महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचे वाभाडे स्थायी समितीच्या सभेत काढण्यात आले़ तत्कालिन आयुक्त हनुमंत भोंगळे यांच्या कार्यकाळात भरती प्रक्रियेत गडबड झाली़ याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असल्याचे आस्थापना विभाग प्रमुख नारायण सोनार यांनी सांगितले़ सदस्य नागसेन बोरसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सोनार बोलत होते़
येथील महानगर पालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली़ यावेळी सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह विमलबाई पाटील, नागसेन बोरसे, रावसाहेब पाटील, संतोष खताळ, सुरेखा देवरे, संजय भील, मुक्तार मन्सुरी, शेख शाहजहान बी़ बिस्मील्ला, सुभाष जगताप, अन्सारी सईदा म़ इकबाल, अमीन पटेल यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते़
भाजपचे सदस्य नागसेन बोरसे यांनी आस्थापना विभागातील गैरकारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले़ या विभागाचे अधीक्षक नारायण सोनार यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केले़ सोनार यांनीही न डगमगता सडेउत्तरे दिली़ बोरसे यांनी अनुसुचित जाती जमातीची किती पदे महापालिकेत रिक्त आहेत असा प्रश्न उपस्थित केला़ तसेच तत्कालिन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कार्यकाळात पद भरतीसाठी जाहीरात काढली गेली होती, तिच्यावर काय कारवाई झाली याबद्दल प्रश्न विचारले़ आस्थापना विभागामार्फत झालेल्या एका भरती प्रक्रियेत बडबड झाल्याविषयी लक्ष वेधले़ तत्कालिन आयुक्त हनुमंत भोंगळे यांनी केलेल्या भरतीवेळी तीन जागांसाठी जाहिरात देण्यात आली़ मात्र, प्रत्यक्षात चार जणांची भरती कशी केली गेली? एका महिला कर्मचाऱ्याची भरती बेकायदेशीर असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून देण्यात आले़ यासंदर्भात सोनार यांना बोरसे यांनी जाब विचारला़ यावर त्यांनी थेट कबुलीच दिली़ एका महिला कर्मचाºयाची बेकायदेशीर भरती झाली आहे़ मात्र, ती भरती आपण नव्हे तर तेव्हाचे आयुक्त हनुमंत भोंगळे यांनी केली असल्याचे सोनार यांनी सांगत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले़ याप्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला़ हद्दवाढीतील गावांमध्ये शौचालयांची दुरवस्था झालेली आहे़ मैला बाहेर येत असल्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण असून तातडीने उपाययोजना झाली पाहीजे अशी मागणी सदस्यांकडून झाल्यानंतर उपायुक्त गिरी यांनी दखल घेत लक्ष देण्याची सूचना स्वच्छता विभागाला केली़
थंडीचे दिवस सुरु असून गोरगरीबांना शालचे वाटप महापालिकेने करावे़ याची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी अमीन पटेल यांनी केली़ यावर महापालिकेच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करुन धोरणात्मक निर्णय घेतल्यावरच हे करता येऊ शकते, असे अर्थ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले़ तर, दानशूर व्यक्तींकडून आपण आवाहन करुन शाल वाटप करता येऊ शकेल़ यासाठी मी प्रयत्न करेल, असे गिरी यांनी सांगितले़ दरम्यान, स्थायी समितीच्या सभेत अनुषंगिक विषयावर चर्चा करण्यात आली़
चर्चेविना विषय मंजूर
मनपा अंतर्गत २०१९-२० या वर्षाकरीता जलशुध्दीकरण केंद्रावर अॅलमचा पुरवठा करण्याबाबत ई-निविदा दर मागविण्यात आले़ त्या विषयावर सभागृहात चर्चा अपेक्षित होती़ मात्र, अजेंड्यावरील विषयाला चर्चेविना लागलीच मंजुरी देण्यात आली़ तर, यावेळेस नागरिकांच्या समस्यांवर कोणत्याही प्रकारची आगपाखड झाली नाही़