वाळूची अवैध वाहतूक पोलिसांनी पकडली १० लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त, फरार दोघांविरोधात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: November 20, 2023 03:58 PM2023-11-20T15:58:19+5:302023-11-20T15:58:53+5:30
पथकाला पाहून दोघे फरार झाल्याने त्यांच्या विरोधात शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.
धुळे : ट्रॅक्टरच्या माध्यमातून हाेणारी अवैध वाळू वाहतूक महसूल पथकाने पकडली. धुळे तालुक्यातील ढंढाणे शिवारात ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. १७ हजार ५०० रुपये किमतीची अडीच ब्रास वाळू आणि १० लाखांचे जेसीबी वाहन असा एकूण १० लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकाला पाहून दोघे फरार झाल्याने त्यांच्या विरोधात शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.
धुळे तालुक्यातील ढंढाणे शिवारात ट्रॅक्टर, तर कधी ट्रकच्या माध्यमातून वाळूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ढंढाणे शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास छापा टाकला. पथकाला पाहून ट्रॅक्टर चालकासह दोघांनी पळ काढला. पथकाने १७ हजार ५०० रुपये किमतीची अडीच ब्रास वाळू आणि यूपी १३-एटी ३४७० क्रमांकाचे जेसीबी, असा एकूण १० लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी धुळे तालुक्यातील ढंढाणे येथील तलाठी छोटू महादू पाटील (वय ५२, रा. गीतानगर, देवपूर) यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार फरार दोघांविरोधात शनिवारी दुपारी पावणे चार वाजता भादंवि कलम ३७९, १०९, ३४ व जमीन महसूल अधिनियम ४८ (८) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक गायकवाड करीत आहेत.