यात्रेत अवैध दारू विकणा:या नांदर्खीच्या उपसरपंचाला अटक
By Admin | Published: May 21, 2017 04:43 PM2017-05-21T16:43:24+5:302017-05-21T16:43:24+5:30
पिंपळनेर पोलीसांची कारवाई : 2 लाखाचा मुद्देमाल जप्त
पिंपळनेर, जि.धुळे - साक्री तालुक्यातील उंभरपाटा यात्रोत्सवात अवैधरित्या देशी, विदेशी, गावठी दारू विक्री करणारा नांदर्खीच्या उपसरपंच कांतीलाल जयवंत कुवर याला पिंपळनेर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 2 लाख 12 हजार 278 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला अटक केली आहे.
साक्री तालुक्यातील उंभरपाटा येथे यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवात अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उंभरपाटा यात्रोत्सवात नांदर्खी शिवारात मान्या चिमा कुवर याच्या शेतात अंधारात उपसरपंच कांतीलाल जयवंत कुवर (रा. नांदर्खी, ता. साक्री) हा त्याच्या वाहनात (एम. एच. 16 ए. जे. 3835) अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. पिंपळनेर पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्यावेळी त्याच्या वाहनात दारूचे खोके, गावठी दारूचे ड्रम आढळून आले. कांतीलाल याच्याकडून अवैध दारूसाठा, ड्रम, व गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. यासंदर्भात पोलीस शिपाई भूषण वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश खटकळ, ललित पाटील, आर. के. रंधीर, प्रवीण अमृतकर, शरद चौरे, पंकज वाघ, राजेंद्र खैरनार, नागेश सोनवणे, प्रवीण सोनवणे, ग्यानसिंग पावरा, योगेश वानखेडे, राजेश मिस्तरी, दीपक माळी, शेखर वाडेकर, सागर ठाकूर यांनी ही कारवाई केली.