पाणी गळत्यांची अखेर होणार दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:23 PM2019-02-28T22:23:21+5:302019-02-28T22:23:59+5:30
महापालिका : १२ मिनिटांच्या सभेत २७ विषय मंजूर
धुळे : शहरात सध्या व्हॉल्व व जल वाहिन्यांना लागलेल्या असंख्य गळत्यांमुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. त्या गळती थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिध्द केले होते़ त्याची दखल घेऊन मनपा स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत या गळत्यांच्या दुरूस्तीसाठी ५ लाख ६१ हजार २३८ रूपये निधीची तरतूद करण्यात आली़
मनपाची स्थायी समितीची बैठक गुरूवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आली़ यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते़ यावेळी सभेत २७ विषयांना मंजुरी देण्यात आली़
शहरातील गळत्या व लिकेजव्दारे लाखो लीटर पाण्याची नासाडी होते़ त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते़ मनपा प्रशासनाने तत्काळ दुरू्स्तीसाठी उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा नागरिकांनी केली होती़ स्थायी समितीच्या सभेत पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी पाच विषयांना मंजूरी देण्यात आली़ तापी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्याने लिकेज काढण्यासाठी ८१ हजार ६२१ रूपये तर कार्याेत्तर खर्च ८९ हजार ६२१ रूपये मंजूरी मिळाली आहे़ देवपुर येथील अमरधान येथे बोअरवेल करून पंप सेट व पाण्याच्या टाकीसाठी ८९ हजार ६०० रूपये तसेच शहरातील विविध प्रभागातील एअर व्हॉल बसविण्यासाठी २ लाख ८५ हजार ९५१ रूपये असा एकूण जलवाहिनी, व्हॉल्ह व नवीन कामांसाठी ५ लाख ६१ हजार २३८ रूपये निधी मंजूर करण्यात आला़
या विषयांना मिळाली मंजुरी
राजीव गांधी नगरातील शौचालय, देखभाल दुरूस्ती़, प्रभाग ३४ मध्ये शौचालय देखभाल दुरूस्त, देवपूर येथील निवडणूक कार्यालयाची दुरूस्ती, शिकाऊ उमेदवारांना विद्या वेतन अदा करणे, आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ, मनपा इमारतीतील फर्निचर व्यवस्था खर्चास मान्यता देण्यात आली़
ठेकेदारांची गुणवत्ता तपासा
डांबरीकरण रस्त्यासाठी एकाच ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे़ त्या ठेकेदराची गुणवत्ता व आर्थिक क्षमता तपासुन ठेकेदाराला ठेका देण्यात यावी अशी मागणी केली होती़ बैठकीत सभापती पाटील,अमिन पटेल, सुभाष जगताप, सुरेखा उगले, नागसेन बोरसे, संतोष खताळ आदींनी मते मांडली़