वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:29 PM2019-10-31T13:29:14+5:302019-10-31T13:29:31+5:30
सर्दी-खोकल्याच्या रूग्णांच्या संख्येत वाढ : दवाखान्यांमध्ये वाढली गर्दी, आरोग्य विभागाने जनजागृती करावी
धुळे : गेल्या काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलत असून, कधी थंडी तर कधी कोरड्या वाºयामुळे सध्या विविध आजारांनी डोके वर काढले आहे. व्हायरल फीवर आणि घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासकीय रूग्णालयांसोबतच खाजगी दवाखान्यांमध्येही गर्दी होवू लागली आहे. अनेक नागरिकांची दिवाळी आजारपणातच साजरी झाली.
गेल्या महिन्याभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान मुले, वृद्ध व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना साथीच्या आजाराची लागण लवकर होत असते.
शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे प्रचंड गारठा निर्माण झालेला आहे. तर आता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
त्यामुळे दिवसा कडक उन्ह व रात्री थंडी अशा वातावरणामुळे साथीचे आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारांमध्येही वाढ झालेली आहे.
श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, खाजगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सर्दी, खोकला, थंडीताप आदी रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरम्यान आजार वाढल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आरोग्याप्रती जनजागृती करणे गरजेचे आहे. व्हायरल फीवरचाही अनेकांना त्रास होऊ लागला आहे.