गाडी थांबवली, सेल्फी काढला अन् सगळ्यांना पाठवला; काही क्षणांत अपघात, ४ जण जागीच ठार
By देवेंद्र पाठक | Published: September 18, 2023 01:15 PM2023-09-18T13:15:18+5:302023-09-18T13:16:48+5:30
अपघातात धुळ्याचे भाजपा नगरसेवक किरण अहिररावसह चार मित्र जागीच ठार झाले.
धुळे: नाशिक जिल्ह्यातील वडाळी भोई गावाजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता कंटेनर आणि कारची धडक झाली. अपघातात धुळ्याचे भाजपा नगरसेवक किरण अहिररावसह चार मित्र जागीच ठार झाले. नाशिक येथे रुग्णालयात दाखल मित्राची तब्येत पाहून परत येत असताना हा अपघात घडला.
धुळे महापालिकेचे नगरसेवक किरण अहिरराव हे आपल्या तीन मित्रांसोबत एमएच १५ डीएस १५०० क्रमांकाच्या कारने नाशिक येथील रुग्णालयात मित्राला भेटण्यासाठी गेलेले होते. तेथून परत येत असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील वडाळी भोई गावाजवळ सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कंटेनर आणि कारची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातात नगरसेवक किरण अहिरराव (वय ४६), प्रविण पाटील, अनिल पवार (दोघी अवधान) आणि मोघण ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मोघण येथील शाळेचे मुख्याध्यापक कृष्णकांत माळी हे चार जण जागीच ठार झाले.
अपघाताची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कारमधून या चौघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वडनेर भैरव पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे वृत्त धुळ्यात कळताच शोककळा पसरली. मयत झालेले प्रवीण पाटील हे ट्रक व्यावसायिक आहेत. अनिल पवार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
अखेरची सेल्फी-
अपघात घडल्याआधी नाशिकमध्ये सोमवारी सकाळपासून महामार्गावर धुके होते. त्यात सेल्फी काढण्याचा मोह झाल्याने नगरसेवक किरण अहिरराव यांनी आपल्या तिघा मित्रांसोबत महामार्गावर गाडी थांबवून सेल्फी काढली होती. ती सेल्फी त्यांनी व्हाटसअपवर अनेक ग्रुपमध्ये सेंड केली होती. त्यानंतर काही अवघ्या १५ ते २० मिनिटांनी हा अपघात घडला. अपघातात चौघे मित्र जागीच ठार झाले.