शाळेच्या पहिल्याच दिवशी ८९ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
By अतुल जोशी | Published: June 5, 2023 04:38 PM2023-06-05T16:38:20+5:302023-06-05T16:38:37+5:30
दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येत असतात. मात्र यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला तूर्त एकच गणवेश देण्यात येणार आहे.
धुळे : सर्वशिक्षा अभियान अंतर्गत यावर्षी पहिली ते आठवीच्या ८९ हजार २६४ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. यासाठी नियोजनही करण्यात आलेले आहे. मोफत गणवेशासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी २ कोटी ६७ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून देण्यात आली.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी व बीपीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येत असतो.
४९ हजार विद्यार्थिनी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत सर्वच मुलींना मोफत गणवेश देण्यात येतो. जिल्ह्यातील ४७ हजार ६७४ विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे. तसेच ४१ हजार ५९० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. त्यामध्ये एस.सी.ची २२२५, एस.टी.ची ३१ हजार २०४ व बीपीएलच्या ८ हजार १६१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
प्रत्येकी एक गणवेश
दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येत असतात. मात्र यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला तूर्त एकच गणवेश देण्यात येणार आहे. दुसऱ्या गणवेशाची अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. शाळा समितीच्या मार्फत या मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पालकांना शिक्षकांनी द्यावयाची आहे.
सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश द्यावा
दरम्यान, पहिली ते आठवी शिकणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोफत गणवेश देण्यात येतो. त्याचप्रमाणे सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेशाचा लाभ दिला पाहिजे, अशीही मागणी होऊ लागली आहे.