व्याजाच्या बदल्यात सावकाराने केली महिलेकडे शरीरसुखाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:31 AM2022-03-28T10:31:10+5:302022-03-28T10:31:36+5:30
१२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे : घेतलेले पैसे व्याजासह परत करावे यासाठी एका तरुण दाम्पत्याला काठीने मारहाण करीत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण, शिवीगाळ व दमदाटीचा हा प्रकार गेल्या दाेन वर्षांत वेळोवेळी घडला.
याप्रकरणी पीडित तरुणाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी सुमारास फिर्याद दाखल केली. पीडित तरुणाने व्याजाने पैसे घेतले होते. त्यानंतर दिलेले पैसे हे व्याजासह परत करावे, अशी मागणी करून तरुणाला वेळोवेळी शिवीगाळ केली जात होती. फोनवरून धमकी दिली जात होती. हा सर्व प्रकार ६ ऑक्टोबर २०२० ते २५ मार्च २०२२ या कालावधीत वेळोवेळी घडत होता. २५ मार्च रोजी तरुणासह त्याच्या पत्नीला काठीने मारहाण केल्याने तिच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. ती गर्भवती असल्याने तिच्या होणाऱ्या बाळाला धोका निर्माण झाला आहे. शिवाय जितेंद्र बैसाणे, समीर गवळी, कल्याण गरुड यांनी पत्नीशी फोनवरून शारीरिक सुखाची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानुसार, जितेंद्र बैसाणे, कल्याण गरुड, समीर गवळी, मिलिंद चौधरी, स्वप्नील जयस्वाल, दिनेश कोळी, ललित पंढरीनाथ पाचोरे, पिंटू बैसाणे, विजय देसले, राेहित ऊर्फ बंटी पहेलवान (सर्व रा. धुळे), ज्योती तमाईचे, अशोक शिरसाठ (दोघे रा. नरडाणा, ता. शिंदखेडा) यांच्याविरोधात सावकारी अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.