दुचाकी चोरट्यांच्या चौकशीत लागला घरफोडीचाही तपास!
By देवेंद्र पाठक | Published: November 30, 2023 06:00 PM2023-11-30T18:00:45+5:302023-11-30T18:01:26+5:30
‘एलसीबी’ची कारवाई : ९ दुचाकींसह साडेतीन लाखांचा ऐवज जप्त
देवेंद्र पाठक, धुळे : गुरुद्वारा येथील उड्डाणपुलाच्या खालून एका चोरट्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी चाेरल्याची कबुली पोलिसांना दिली. शिवाय चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी केल्याची कबुलीही दिली. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजाराचा मुद्देमालासह ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुचाकी चोरीच्या घटना सध्या सातत्याने सुरू आहेत. अशातच दुचाकी चोरणारा चोरटा हा गुरुद्वाराजवळ उभा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच पथक रवाना करण्यात आले. गुरुद्वारा उड्डाणपुलाच्या खाली दोन अल्पवयीन मुलांसह फैजान मुजम्मिल अन्सारी (वय २२, रा. कबीरगंज, वडजाई रोड, धुळे) याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीच्या दुचाकीची कबुली देत अन्य ९ दुचाकी देखील पोलिसांना काढून दिल्या. चोरीच्या दुचाकींमध्ये ४ जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यांची किंमत ३ लाख ४१ हजार आहे; तसेच फैजान अन्सारी आणि दोन अल्पवयीन अशा तिघांनी मिळून संत नरहरी कॉलनी, अंबिकानगर येथील बंद घरात चोरी केल्याची माहिती देत ६ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि ५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. दुचाकीसह चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी प्रकाश पाटील, श्याम निकम, संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील, योगेश साळवे, हर्षल चौधरी यांनी कारवाई केली.