जिल्ह्यात आत्महत्यावार ! चौघांनी आयुष्य संपवले
By देवेंद्र पाठक | Published: February 13, 2024 05:31 PM2024-02-13T17:31:39+5:302024-02-13T17:32:21+5:30
घटनेचे कारण अस्पष्ट; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद.
देवेंद्र पाठक,धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या चार ठिकाणी चारजणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
टेकवाडे, ता. शिरपूर - शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील दीपक दगा सैंदाणे (२५) याने राहत्या घरातील रूममधील फॅनला साडीचा आधार घेऊन गळफास लावून घेतला. ही घटना रविवारी रात्री (वेळ निश्चित माहिती नाही) घडली. सोमवारी सकाळी ही बाब उजेडात आली. त्याला तातडीने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पवन ईशी घटनेचा तपास करीत आहेत.
बोराडी, ता. शिरपूर - शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील निरमा राहुल पावरा (२२) या तरुणीने शेतातील एका झाडाला स्वत:च्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळात घडली. घटना लक्षात येताच तिला शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घाेषित केले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे करीत आहे.
सुट्रेपाडा, ता. धुळे - धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा येथील केतन विनायक मोरे (१७) या मुलाने नैराश्यातून शाळेतील वसतिगृहातील बाथरूममध्ये दाेरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक धनवटे करीत आहेत.
देवभानेे, ता. धुळे - धुळे तालुक्यातील देवभाने येथील विमलबाई बनगर सोनवणे (७०) या वृद्ध महिलेने जुन्या आजाराला कंटाळून घराच्या छतास सुती दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या पूर्वी घडली. सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दराडे घटनेचा तपास करीत आहेत.