जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या, बभळाज आणि पडावद गावातील घटना
By अतुल जोशी | Published: September 26, 2023 08:02 PM2023-09-26T20:02:54+5:302023-09-26T20:04:18+5:30
प्रथमदर्शनी अकस्मिक मृत्यूची नोंद
अतुल जोशी, धुळे : शिरपूर तालुक्यातील बभळाज आणि शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी प्रथमदर्शनी अकस्मिक मृत्यूची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील रोहिदास उदेसिंग राठोड (वय ४७) यांनी सोमवारी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास जगन पुंडलिक महाजन यांच्या शेतात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्यांना खाली उतरवून कॉटेज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पडावद येथील घटना
शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथील इंदिरा नगरात राहणारे सुधाकर सीताराम पवार (वय ६०) यांनी राहत्या घरातील खिडकीला केबल वायर बांधून गळफास घेतला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. घटना लक्षात येताच त्यांना नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास डॉ. प्रशांत जावरे यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.