बाजार समितीत कांदा खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:42 PM2019-01-01T21:42:53+5:302019-01-01T21:43:50+5:30
धुळे कृउबा : बाजाराच्या दिवशी १ हजार क्विंटल कांद्याची आवक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील बाजार समितीत मंगळवारी एक हजार क्विंटल कांदा व सुमारे ५०० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. वजन काट्यावच या मालाची मोजमाप करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव दिनकर पाटील यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक काट्यावर शेतीमालाचे वजन केल्यास शेतकऱ्यांच्या हिशोब पट्टीतून कुठल्याही प्रकारची तोलाई आकारण्यात येऊ नये या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी कृउबात २७ डिसेंबरपासून सुरू झाली. मात्र शासन निर्णयाची अमलबजावणी करावी, अशी शेतकºयांची मागणी होती. त्यावरून शेतकरी व हमाल-मापाडी यांच्यात वाद झाला होता. दरम्यान यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कृउबातील लिलाव बंद राहणार असल्याची नोटीस कृउबाच्या फलकावर लावण्यात आली होती.
गेल्या चार दिवसांपासून कृउबात लिलाव बंद होता. मात्र आज मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत एक हजार क्विंटल कांद्याची तर ४६६ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. हा माल लहान काट्यांवरच मोजण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान हमाल-मापाडींच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. बाजार समितीत खरेदी सुरू झाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.
गुरांचीही खरेदी- विक्री
दरम्यान मंगळवारी येथील बाजार समितीत गुरांची खरेदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात आले.
सध्या पाण्याबरोबरच चाºयाचीही टंचाई निर्माण झालेली असल्याने, अनेक पशुपालकांनी गुरे विक्रीला काढले आहेत. मंगळवारीही गुरांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. काही गुरे अगदी कमी किंमतीत विकण्यात आल्याचे शेतकºयांनी सांगितले.