अवकाळी पावसाचा ४८ गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:19 PM2019-05-04T22:19:22+5:302019-05-04T22:19:56+5:30
वादळी पाऊस, गारपीट : ४४२.५८ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान
धुळे : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा चारही तालुक्यांना फटका बसला असून ४४२.५८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे कमी-अधिक फरकाने नुकसान झाल्याचे सुधारित प्राथमिक अंदाजाच्या अहवालात म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने केळी, पपई, मका, लिंबू, आंबा, बाजरी व भाजीपाला पिकांचा समावेश आहे. साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्यात १५, १६ व १७ असे सलग तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात जिल्ह्यातील गोराणे, कंचनपूर, अजनाड, विखरण, हिसाळे, वाघाडी, भोरखेडा, तरडी, तोंदे, नटवाडे, आलण, थाळनेर, बोराडी, मुखेड, बलकुव, तºहाड कसबे, साक्री आदी शिवारात वादळी पावसाने धुमाकूळ घातला होता. सोबत गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला होता. त्यानंतर आता सुधारित प्राथमिक नजर अंदाज प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४८ गावांमधील सुमारे ८५० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद केले असून एकूण ४४२.५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात ३३ टक्क्यापेक्षा जास्त बाधित क्षेत्र ३६४.०१ हेक्टर तर त्यापेक्षा कमी बाधित क्षेत्र ७८.५७ हेक्टर आहे. सुधारित प्राथमिक अंदाजानुसार साक्री तालुक्यात सर्वाधिक म्हजे ३०४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तर सर्वात कमी धुळे तालुक्यात ५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या समितीकडून नुकसानाचा अहवाल तयार करून तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविला जाईल. त्यानंतर कृषी विभागाकडून झालेल्या पिकांच्या नुकसानाचे मूल्यांकन केले जाईल.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समितीकडून अंतिम अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे असे सूत्राकडून सांगण्यात आले.