संततधार पावसामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:07 PM2019-08-05T12:07:52+5:302019-08-05T12:08:21+5:30
ठिकठिकाणी जलपूजन : नदी, नाले, बंधारे आणि धरणही तुडूंब, शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे, सुराय येथील पाणी टँकर बंद
धुळे- जिल्ह्यात अपवाद वगळता संततधार पाऊस सुरूच आहे. यामुळे नदी, नाले, बंधारे आणि धरणही ओसंडून वाहत आहे. यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान साक्री तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पांझरा, बुराई नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे, सुराय येथील पिण्याच्या पाण्याचा टँकर बंद झाला आहे.
साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शनिवारी सकाळपासूनच ‘ओव्हर फ्लो’ झाले. त्यामुळे पिंपळनेर येथे पांझरा नदीस मोठा पूर आला. हे पाणी अक्कलपाडा धरणात पोहचले. अक्कलपाडा धरणही ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे गेट उघडण्यात आले आहे. दरम्यान, पांझरा नदीच्या पुरामुळे मलांजन, देगाव आदी गावांचा संपर्क तूर्तास तुटला आहे.
जून महिन्यात झालेल्या पावसानंतर पावसाने दडी मारली. यामुळे पेरण्या केलेले शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीने संकटात सापडले होते. मात्र पंधरवड्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. तसेच उर्वरीत पेरण्यांचे कामही आटोपले आहे. सध्या पिकांची जोमदार वाढ होत असून संततधार पाऊस सुरु आहे.
पिंपळनेर येथे रस्ते व पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने स्थानिक प्र्रशासनांनी नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पिंपळनेर शहरात पुरामुळे नदीलगत असलेल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मालपूर परिसरात गावांचा पाणीप्रश्न मार्गी
*मालपूर- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे चुडाणे येथील पाण्याचे टॅँकर बंद झाले. तर सुरायचा पाणी टंचाईचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.
*मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, अवकलकोस, कलवाडे, कर्ले, परसोळे, देवकानगर, वैंदाणे या भागात ४ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून दमदार पाऊस होत आहे.
४पहाटेच्या सुमारास या परिसराला पावसाने झोडपून काढले. झालेल्या पावसामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या बंधाºयांमध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
*शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईचा सामना चुडाणे- सुराय या गावांना करावा लागतो. चुडाणे येथे गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यातही पाण्याचे टॅँकर सुरू होते. मात्र गावालगत झालेले सर्वच बंधारे भरल्याने, गावविहिरीला पाणी आले. त्यामुळे येथील पाण्याचे टॅँकर बंद करण्यात आल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे.
*सुराय गावालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र होत असलेल्या दमदार पावसामुळे गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर तुडूंब भरल्याने, गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
४मालपूर गावातही रविवारी पहाटेपासून येथे पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या बंधाºयांमध्ये पाणी साचले आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे.