लहान मुलांच्या भांडणावरून महिलेला झोडपले चिंचवार गावातील घटना; तिघांवर गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: October 21, 2023 03:52 PM2023-10-21T15:52:57+5:302023-10-21T15:53:06+5:30
लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.
धुळे : लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. ही घटना धुळे तालुक्यातील चिंचवार गावात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात शुक्रवारी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
कमाबाई राजू ठेलारी (वय ५०, रा. चिंचवार, ता. धुळे) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, धुळे तालुक्यातील चिंचवार गावात लहान मुले खेळत होती. त्यांच्यात भांडण झाले. हे भांडण सोडवित असताना मोठ्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने शिवीगाळपर्यंत जाऊन पोहोचला. संतापाच्या भरात एकाने हातातील काठी उचलून महिलेवर उगारली. यात डाव्या हाताच्या पंजाच्या जवळील मनगटावर मारून दुखापत केली. इतर दोघांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. मारण्याची धमकी दिली.
ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. जखमी अवस्थेत महिलेला सोडून तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर कमाबाई ठेलारी या महिलेने सोनगीर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी पावणेबारा वाजता गावातीलच तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र राठोड घटनेचा तपास करीत आहेत.