गुटखा न दिल्याने जमावाची चौघांना मारहाण, १३ जणांविराेधात दंगलीचा गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: September 24, 2023 03:49 PM2023-09-24T15:49:26+5:302023-09-24T15:50:36+5:30
शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता १२ ते १३ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
धुळे : पानटपरीतून गुटख्याची पुडी आम्ही विकत नाही, असे सांगितल्याचा राग मनात धरून जमावाने चौघांवर लोखंडी सळई, चाकूसह काठीने हल्ला चढविला. यात चौघांना दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास साक्री येथे घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता १२ ते १३ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शांताराम तुकाराम क्षीरसागर (वय ४९, रा. घोडदे, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, साक्री येथील बालाजी हॉटेलच्या आवारात शांताराम क्षीरसागर यांची पानटपरी आहे. या पानटपरीवर गुटख्याची पुडी घेण्यासाठी काही जण आले. या पानटपरीवर आम्ही गुटख्याची विक्री करत नाही, असे सांगितल्याचा राग आल्याने वाद निर्माण झाला.
जमावाने शिवीगाळ करत शांताराम यांचा मुलगा नीलेश आणि नातू मनीष कमलाकर क्षीरसागर यांना चाकूने मारून गंभीर दुखापत केली. त्यांना वाचवत असताना फिर्यादीसह राहुल उमाकांत क्षीरसागर अशा चौघांना मारहाण करण्यात आली. यात लोखंडी सळई, काठीचा सर्रासपणे वापर करण्यात आला. एवढेच नाहीतर जमावाने पानटपरीमधील फ्रीज, इतर साहित्य असे फेकून तोडफोड करत नुकसान करण्यात आले. यानंतर आरडाओरड करत जमाव निघून गेला.
चार जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार, १२ ते १३ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा साक्री पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम करीत आहेत.