चाचण्या वाढल्या, अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ गणशोत्सवात काळजी घ्या - जिल्हाधिकारी संजय यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:22 PM2020-08-21T19:22:53+5:302020-08-21T19:30:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तसेच अहवालही प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तसेच अहवालही प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. चाचण्यांचे प्रमाणं दुप्पट झाल्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान गणेशोत्सवात कोरोनाचा फैलाव होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी व कोरोनाचा प्रसार थांबवावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी 'लोकमत'शी बोलताना केले आहे.
जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ३५५ इतकी झाली आहे. मागील काही दिवसांपासून शंभर पेक्षा अधिक नवे बाधित रुग्ण आढळत आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सध्या १ हजार ५५५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जुलै महिन्यापर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजारापेक्षा कमी होती. मात्र आता रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. बाप्पाची आरती करतानाही मास्कचा वापर करावा तसेच शारीरिक अंतर राखावे असेही त्यांनी सांगितले.
धुळे शहरात सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये धुळे शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. शहरातील ७३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. धुळे तालुक्यातील २२६, शिरपूर १६६, शिंदखेडा २६५ व साक्री तालुक्यातील १६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते व पत्रकारांनीही चाचणी होणार
महापालिकेने शासनाकडे ३ हजार अँटीजेन किटची मागणी नोंदवली आहे. लवकरच अँटीजेन किट प्राप्त होणार असून शहरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते व पत्रकारांचीही चाचणी करण्याच्या सूचना महानगर पालिकेला केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून शासनाच्या नियमानुसार चाचण्या होत आहेत असेही त्यांनी सांगितले.