भ्रष्टाचार वाढल्याने नक्षलवादासारख्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 05:07 PM2017-10-15T17:07:35+5:302017-10-15T17:09:16+5:30
अभयकुमार सिंग : विद्यावर्धिनी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देशातील विकासाचा पैसा भ्रष्टाचारात जात असल्याने नक्षलवाद, दहशतवादासारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत़ विकासाबरोबर आपण विनाशही ओढवून घेत असल्याने भ्रष्टाचार रोखण्याची प्रबळ इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक आहे, असे मत प्रा़डॉ़ अभयकुमार सिंग (अयोध्या, उत्तरप्रदेश) यांनी व्यक्त केले़
विद्यावर्धिनी महाविद्यालयात ‘एकविसाव्या शतकातील नक्षलवाद चळवळ : कारणे व उपाययोजना’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद््घाटन रविवारी झाले़ त्यावेळी प्रा़डॉ़ अभयकुमार सिंग बोलत होते़ या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ़ बी़बी़पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ़ दिलीप पाटील, नाशिक येथील भोसला मिलीटरी कॉलेजचे डॉ़ पी़ए़घोष, तहाराबाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ मनोज साळी, पितांबर महाले, अक्षय छाजेड, युवराज करनकाळ, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, प्राचार्य डॉ़ ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़ यावेळी बोलतांना प्रा़डॉ़ सिंग म्हणाले की, नक्षलवाद हा सरकारच्या काही चुकांचा परिणाम असून देशासमोरील समस्यांमध्ये वाढ झाली आहे़ नक्षलवाद, दहशतवाद या प्रमुख समस्या आहेत़ पूर्वी केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित असलेला नक्षलवाद अलिकडे शहरी भागातही पसरत असून चीन, पाकिस्तान सारख्या देशांचे त्यांना पाठिंबा मिळत आहे़ विकासाचा पैसा भ्रष्टाचारात जात असल्याने या समस्यांना बळ मिळत आहे़ विकासाचा विचार होत असला तरी विकासाबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होत असून ती विनाशाकडे नेणारी आहे़ त्यामुळे सर्व समस्यांचे मुळ असलेला भ्रष्टाचार रोखण्याची प्रबळ इच्छाशक्ती हवी, असे मत प्रा़डॉ़ सिंग यांनी व्यक्त केले़ दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़.