वाढत्या आरोग्य खर्चाने देश आर्थिक संकटाकडे : प्रवीण तोगडिया
By admin | Published: May 21, 2017 05:42 PM2017-05-21T17:42:53+5:302017-05-21T18:37:05+5:30
देशातील जनता आरोग्यावर दरवर्षी 14 लाख कोटी रुपये खर्च करीत आहेत.
Next
जळगाव,दि.21- देशाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचे मिळून एकूण उत्पन्न 16 लाख कोटी रुपये असताना देशातील जनता आरोग्यावर दरवर्षी 14 लाख कोटी रूपये खर्च करीत आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व अन्य काही संस्थांच्यामते पुढील 20 वर्षात देशातील आजारी व्यक्तींचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के र्पयत जाईल. अशा परिस्थितीत आरोग्यावरील नागरिकांचा खर्च दर वर्षाला 280 लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देश मोठय़ा आर्थिक आपत्तीच्या तोंडावर उभा असल्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व इंडिया हेल्थ लाईनचे अध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी दिला.
इंडिया हेल्थ लाईन या उपक्रमांतर्गत आरोग्यदूत नेमून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी सकाळी कालिकामाता मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये डॉ.तोगडिया यांच्या हस्ते दीपप्रज्वालनाने झाले.
यावेळी व्यासपीठावर देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.कुलदीप राऊळ, उपाध्यक्ष डॉ.विक्रम चौबे, विहिंपचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे, प्रांत प्रभारी हेमंत त्रिवेदी, जळगाव अध्यक्ष सुरेंद्र मुंदडा, राजेश जहागिरदार, प्रांत सहमंत्री ललित चौधरी, आयएमएचे माजी सहसचिव डॉ.विलास भोळे, सहसचिव डॉ.स्नेहल फेगडे उपस्थित होते.
रॉकेटच्या गतीने ही रुग्णांची संख्या वाढते आहे. 20 वर्षात देशातील 50 टक्के लोकसंख्येला आजाराने ग्रासलेले असेल. तसेच औषधोपचारावरील जनतेचा खर्च 280 लाख कोटींवर जाईल. त्यामुळे देश आर्थिक महासत्ता तर सोडाच दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर लोटला जाईल, असे ते म्हणाले.