प्रवासी भाड्यात वाढ; पण सुविधांची बोंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 09:25 PM2017-08-06T21:25:12+5:302017-08-06T21:26:06+5:30
अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर : गाडीचे स्वरूप पूर्वीसारखेच राहू द्या; प्रवाशांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : रेल्वेप्रशासनाने सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकसाठी सुरु असलेल्या अमरावती फास्ट पसेंजर या गाडीचे रूपांतर आता मेल एक्सप्रेसमध्ये केले असून प्रवासी भाड्यात सुमारे ६६ टक्के वाढ केली आहे. मात्र कोणत्याही जादा सुविधा न पुरविता म्हणजे सुविधांच्या नावाने बोंब असताना भाडेवाढ झाल्याने सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाने अमरावती -सूरत फास्ट पॅसेंजरचे रूपांतर शुक्रवार ४ आॅगस्ट पासून अमरावती -सूरत मेल असे केले असून प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. सूरत -अमरावती भाड़े पूर्वी ११५ रुपए होते ते आता १९५ रुपये झाले आहे.
येथून सुरत येथे जाण्यासाठी पूर्वी ४५ रुपये भाड़े होते ते आता ७५ रुपये झाले आहे . अमरावतीला पूर्वी ७० रुपये भाडे लागत असे, आता मात्र त्यासाठी १२० रुपए मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुढाकाराने २००७ साली अमरावती -सूरत फास्ट पैसेंजर सुरु झाली होती. अमरावती, अकोला, जळगाव, धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतमजूर व आर्थिक दुर्बल घटकातील प्रवाशांची सूरत, शेगाव व जळगाव जाण्यासाठी सोय व्हावी म्हणून गाडी क्रमांक ५९०२५ व गाडी क्रमांक ५९०२६ सुरू केली होती.
येथील रेल्वे स्थानकावरून सूरतकडे जाण्यासाठी संध्याकाळी ४.२३ वाजता सोमवार, शुक्रवार व शनिवार तर भुसावळकडे जाण्यासाठी गुरूवार, शुक्रवार व शनिवार असे प्रत्येकी तीन-तीन दिवस सदर गाडीची सुविधा आहे. कामानिमित्त हजारो मजूर या गाडीने प्रवासी करतात. त्यांना ही गाडी अल्प खर्चिक असल्याने वरदान ठरली होती.
गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी यापूर्वी भाविक अल्प भाड्याने जात असत. फारशा सुविधा नसल्या तरी कमी भाड्यामुळे या गाडीला प्रवासी मोठ्या संख्येने मिळत असत.