बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने शिक्षकाचे धुळे जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:35 PM2018-09-05T12:35:14+5:302018-09-05T12:37:21+5:30
न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
लोकमत आॅनलाइन
धुळे : जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत झालेला अन्याय दूर करून न्याय मिळावा या मागणीसाठी चिंचखेडे (ता. साक्री) येथील शिक्षक भास्कर निंबा अमृतसागर यांनी शिक्षक दिनापासून जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे.
अमृतसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ फेब्रुवारी १७ च्या बदली निर्णयानुसार संवर्ग १ व संवर्ग २ यांनी मी जि.प.शाळा सावळदे (ता. धुळे) येथे कार्यरत असतांना मला व माझ्या पत्नी कल्पना झाल्टे (जि.प.शाळा, दिवाणमाळा,ता.धुळे) यांना खो दिल्याने विस्थापित झालो. संवर्ग ४ प्रमाणे बदलीसाठी २० शाळा आॅनलाइन पद्धतीने पसंतीक्रमाने दिल्या. त्यानुसार लळिंग जि.प. शाळा मला देण्यात आली. परंतु पत्नीला विस्थापित यादीत समाविष्ट करण्यात आले. पत्नीला न्याय मिळाला नाही.
पती-पत्नी जि.प. सेवेत असतांना व ३० कि.मी.च्या अंतरात असतांना २८ मे १८च्या आदेशान्वये अमृतसागर यांना पुन्हा विस्थापित करण्यात आले. याबाबत जि.प.प्रशासन व शासनस्तराव त्यांना कुठल्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाही. विस्थापित करण्याबाबत कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे अमृतसागर यांचे म्हणणे आहे.
पती-पत्नी दोघेही ३० कि.मी.च्या आत कार्यरत असतांना संवर्ग ५च्या बदली प्रक्रियेत भास्कर अमृतसागर यांना चिंचखेडे (ता. साक्री) तर त्यांची पत्नी कल्पना झाल्टे यांना बोरकुंड (ता. धुळे) येथे पदस्थापित करण्यात आले. पती-पत्नी एकत्रीकरणात अन्याय होऊ नये असे शासन आदेश आहेत. मात्र भास्कर दाम्पत्याला पदस्थापित केलेल्या गावांमध्ये ७० कि.मी.पेक्षा जास्त अंतर आहे.
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र न्याय मिळाला नाही.
न्याय मिळावा यासाठी त्यांनी शिक्षक दिनापासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. भास्कर अमृतसागर हे संसारपयोगी साहित्य घेऊनच आंदोलनाला बसले आहे. त्यांचे हे आंदोलन लक्षवेधक ठरत आहे.