मोबाइल मेडिकल युनिट कर्मचाऱ्यांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:12+5:302021-05-25T04:40:12+5:30
धुळे : मोबाइल मेडिकल युनिटच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना सलग ९ वर्षे आरोग्यसेवा देणाऱ्या मोबाइल मेडिकल युनिटमधील ...
धुळे : मोबाइल मेडिकल युनिटच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना सलग ९ वर्षे आरोग्यसेवा देणाऱ्या मोबाइल मेडिकल युनिटमधील कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना काळात उपासमारीची वेळ आणली आहे. प्रामाणिकपणे रुग्णसेवा करून देखील आमच्यावर अन्याय झाल्याचा रोष व्यक्त केला असून उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत मोबाइल मेडिकल युनिटच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. चित्रा पाटील, औषध निर्माता जईद अन्सारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रभाकर लोंढे, परिचारिका बेबी मोरे, वाहनचालक मनोज आनंदा बैसाणे आणि समाधान गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात शिरपूर आणि साक्री या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी नाेव्हेंबर २०११पासून मोबाइल मेडिकल युनिट सुरू करण्यात आले. युनिटमधील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सन २०११ ते २०१९ पर्यंत सतत ९ वर्षे अतिशय दुर्गम भागात जाऊन प्रामाणिकपणे रुग्णसेवा केली. त्यानंतर मोबाइल मेडिकल युनिट जिल्हा परिषदेने बंद केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. मोबाइल मेडिकल युनिट सुरू झाल्यावर जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असे तोंडी आश्वासन आरोग्य विभागाने दिले होते. दरम्यान, २० जानेवारी २०२१ रोजी मोबाइल मेडिकल युनिटसाठी जागा भरण्याची जाहिरात देण्यात आली. जाहिरातीमध्ये दिलेल्या व्हाॅटस् ॲप क्रमांकावर जुन्या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु ३१ जानेवारीला जाहिरात रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १४ मे २०२१ रोजी मोबाइल मेडिकल युनिट सुरू झाल्याची आणि त्यावर नवीन कर्मचाऱ्यांची भरती केल्याची माहिती जुन्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यामुळे सलग ९ वर्षे रुग्णसेवा करूनदेखील आमच्यावर अन्याय झाल्याची भावना जुन्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कामाचा अनुभव असल्याने नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार आम्हाला संधी द्यायला हवी होती, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
३१ मेपासून उपोषणाचा इशारा
मोबाइल मेडिकल युनिटचे काम आरडब्ल्यू कंपनीने घेतले असून या कंपनीने त्यांच्या स्तरावर भरती प्रक्रिया राबविली आहे, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. परंतु नवीन सर्व कर्मचारी धुळे शहर आणि जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जर जागा भरण्याची जाहिरातच आली नाही तर नवीन कर्मचाऱ्यांना जागा निघाल्याचे कसे कळले किंवा त्यांना कोणी निरोप दिला असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे जुन्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या संसर्गामध्ये आरोग्य विभागाने गेल्या दोन वर्षांपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आणली असून आठ दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर ३१ मे पासून आम्ही जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.