धुळे तालुक्यातील शिरधाने येथे लसीकरणामुळे झालेल्या बालमृत्यूची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:23 AM2019-09-19T11:23:07+5:302019-09-19T11:23:26+5:30
ग्रामस्थांचे सीईओंना निवेदन : प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
आॅनलाइन लोकमत
धुळे : तालुक्यातील मौजे शिरधाने येथे एक महिन्याच्या बालिकेचा सदोष बी.सी.जी. लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नेर आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या शिरधाने आरोग्य उपकेंद्रातर्गत २ सप्टेंबर १९ रोजी नियमित लसीकरण झाले. शीतल ठाकरे यांच्या एक महिन्याच्या स्त्री जातीच्या बालकाला बी. सी. जी. लस देण्यात आली. त्यानंतर बालक लगेच मुलूल झाले. त्याने दूध पिणे बंद केले. याबाबत आरोग्यसेविकांना माहिती दिली. मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे बालक ३ सप्टेबर रोजी दगावले. याचा जाब आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. लसीकरणापूर्वी बालकाची प्रकृती साधारण होती असे निवेदनात म्हटले आहे. आरोग्य विभागातील कर्मचाºयांनी सेवा देण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात कुटुंब कल्याण विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर डॉ. पटेल या चौकशीसाठी आल्या. त्यांनी आरोग्य कर्मचाºयांचीच बाजू घेतली.सदोष लसीकरणामुळे बालकाचा मृत्यू झाला हे मानायला आरोग्य विभाग तयार नाही. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन त्रयस्थ समितीमार्फत पुन्हा चौकशी करून दोषी आरोग्य कर्मचाºयांवर कारवाई करावी . निवेदनावर गणेश सोनवणे, दाजभाऊ पाटील, सतीष पाटील, शांतीलाल पाटील, सुरेश सोनवणे, प्रकाश सोनवणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा सर्वेक्षण अधिकारी शिरधाने येथे जाऊन आले. त्यांनी अहवाल सादर केला आहे. बालिकेचा मृत्यू सदोष लसीकरणामुळे झालेला नाही असे जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी सांगितले.