बनावट रेमडेसिविर इंजेक्शनांचा वापर थांबविण्यासाठी तत्काळ चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:03+5:302021-05-23T04:36:03+5:30

धुळे : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत वापरण्यात आलेल्या रेमडेसिविर, टोसीलीझूमॅब तसेच म्युकर मायकोसिस व तत्सम आजारासाठी वापरले जाणारे ...

Inquire immediately to stop the use of fake remedivir injections | बनावट रेमडेसिविर इंजेक्शनांचा वापर थांबविण्यासाठी तत्काळ चौकशी करा

बनावट रेमडेसिविर इंजेक्शनांचा वापर थांबविण्यासाठी तत्काळ चौकशी करा

Next

धुळे : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत वापरण्यात आलेल्या रेमडेसिविर, टोसीलीझूमॅब तसेच म्युकर मायकोसिस व तत्सम आजारासाठी वापरले जाणारे एम्फोनेक्स्-५०एमजी या औषधांच्या बनावट निर्मितीची शासनस्तरावरुन चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन माजी आमदार व सामाजिक कार्यकर्ते प्रा. शरद पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना इ-मेलवर पाठविले आहे.

अमरावती विभागात बोगस रेमडेसिविर वापरामुळे रुग्ण दगावत असल्याने तत्काळ वापर थांबविण्याचे पत्र आरोग्य सेवा आयुक्तलयाच्या मुंबई खरेदी कक्षाने राज्यातील सर्व उपसंचालक, अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविल्याने प्रा. शरद पाटील यांनी केलेल्या तक्रारीस पुष्टी मिळाली आहे.

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात या आजारात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर या इंजेक्शनचा सर्रास वापर करण्यात आला. कदाचित वैद्यक क्षेत्राची गरजही असेल. मात्र, मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या मागणीतून या जीवनदायी औषधांच्या काळ्याबाजाराबरोबर बनावट रेमडेसिविर, स्टेरॉईड आणि ॲट्टेम्रा व टोसीलीझूमॅब इंजेक्शन बाजारात आली. अशा बनावट इंजेक्शनमुळे वैद्यक क्षेत्राच्या प्रामाणिक प्रयत्नांना बाधा येऊन मोठ्या प्रमाणात मृत्यू दर वाढला आहे व तो अजूनही सुरू आहे.

जागरुक नागरीक, पोलीस, अन्न व प्रशासन विभाग यांनी अशा प्रवृत्तींना प्रतिबंध करण्याचा, अटकाव करण्याचा प्रामाणिक प्रयत्नदेखील केला आहे.

महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांतून बनावट रेमडेसिविर इंजेक्शनचे कारखाने उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या जबाबदार वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. राज्यात सुमारे दोन कोटी पेक्षा जास्त बोगस इंजेक्शने वितरीत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे शासन व वैद्यकीय क्षेत्राचे प्रयत्न निष्फळ ठरून मृत्यू दर वाढला आहे. शिवाय कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना हृदयविकाराचा तीव्र झटका येणे, अर्धांगवायूचा झटका येणे, मूत्रपिंडे निकामी होणे, म्युकर मायकोसिस आजारातून श्वास कोंडणे, काळी बुरशीचा चट्टा येणे, तोंडातील टाळूवर हार्ड पॅलेट आढळणे, दात कुजणे, गाल तसेच चेहरा सुजणे, अंध्वत्व येणे आणि मेंदूत बुरशी जाऊन मृत्यू येणे असेही प्रकार घडत आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून या बोगस औषधी निर्माण करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना शेाधून काढून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून त्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी माजी आमदार शरद पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना इ-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. ते त्यांची याबाबत लवकरच समक्ष भेट घेणार आहेत.

Web Title: Inquire immediately to stop the use of fake remedivir injections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.