निकृष्ट मूगडाळ वाटपाची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:33+5:302021-05-28T04:26:33+5:30
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन लि., मुंबई यांच्यामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून अंगणवाडीतील बालकांना कडधान्य वाटप योजना ...
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन लि., मुंबई यांच्यामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून अंगणवाडीतील बालकांना कडधान्य वाटप योजना राबविण्यात येते. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी १६ मार्च ते १५ मे २०२१ या महिन्यातील कडधान्य, गहू, तांदूळ व चवळी प्रत्येकी दोन पाकीट, तर मूगडाळ, साखर, हळद, मिरची पावडर, मीठ यांचे प्रत्येकी एक पाकीट अशी एकूण ११ पाकिटे एका बालकासाठी वाटप करण्याचा उद्देश आहे. मात्र प्रत्यक्षात पुरवठा करण्यात येणाऱ्या पावतीवर पेन्सिलने हेराफेरी करून बालकांना अंगणवाडीतून फक्त दहाच पाकिटे वाटप व मूगडाळ निकृष्ट दर्जाची वाटप करण्यात आली. याबाबत २६ मे रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शिरपूर एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाने दखल घेतली. बुधवारी अंगणवाडी पर्यवेक्षक (सुपर वायझर) चौकशीसाठी आले. त्यांनी कमी प्रमाणात वाटप झालेल्या कडधान्याच्या पावत्या ताब्यात घेऊन निकृष्ट दर्जाच्या वाटप झालेल्या मूगडाळीचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
तसेच इतरही अंगणवाड्यांमध्ये हाच प्रकार सुरू असल्याने पालकांमध्ये बोलले जात असून, निकृष्ट दर्जाची मूगडाळ वाटप करणाऱ्या ठेकेदार व संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.