शिरपूर तालुक्यातील उपाययोजनांची पहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 09:34 PM2020-04-25T21:34:43+5:302020-04-25T21:34:59+5:30
जिल्हाधिकारी । सतर्क राहण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शनिवारी शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील संस्थात्मक विलगिकरण कक्ष, कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि नगरपालिकेला भेट देवून उपाययोजनांचा आढावा घेतला़ तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर भेट देवून तेथील बंदोबस्ताचीही पाहाणी केली़
यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण शिरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागासह प्रत्येक विभागाने सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. शेजारील मध्यप्रदेशातील सेंधवा परिसरातही कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत सीमेवरील गस्त वाढवावी. आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तालुक्याचा काही भाग आदिवासी बहुल व डोंगराळ आहे. या भागात पुरवठा विभागाने विहित कालावधीत अन्नधान्याचा पुरवठा करावा. कोणीही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळत घरीच थांबावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी आवाहन केले.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्याची परिस्थिती गंभीर आहे़ त्यामुळे नागरीकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे़ प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे़ लक्षणे दिसताच रुग्णालयात तपासणी करावी़ विनाकारण बाहेर पडू नये़ गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़