सरकारकडे भिक्षेची झोळी पसरण्याऐवजी आपल्या बोली भाषांना सन्मान द्यायला हवा: प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे
By देवेंद्र पाठक | Published: March 3, 2024 05:58 PM2024-03-03T17:58:19+5:302024-03-03T17:59:22+5:30
चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
देवेंद्र पाठक, धुळे : आपला देश खऱ्या अर्थाने खेड्यातला आणि शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे त्यांचीच भाषा ही खरी अभिजात भाषा असून, या हिशोबाने अहिराणी ही अभिजात भाषा ठरते. सरकारकडे भिक्षेची झोळी पसरण्याऐवजी आपणच आपल्या बोली भाषांना सन्मान देणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमात ही भाषा यावी यासाठी प्रयत्न करावेत आणि असे झाल्यास संमेलनाचे हे यश ठरेल, असे प्रतिपादन १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्यिक प्रा. डाॅ. वासुदेव मुलाटे यांनी अहिराणी संमेलनात व्यक्त केले.
अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि विद्यावर्धिनी सभा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यावर्धिनी महाविद्यालयात स्व. अण्णासाहेब सदाशिव माळी साहित्य नगरीत चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. डाॅ. मुलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे चेअरमन अक्षय छाजेड होते, तर स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील होते. व्यासपीठावर अहिराणी साहित्य परिषदेचे धुळ्याचे अध्यक्ष प्रा. भगवान पाटील, कोल्हापूरचे प्रतापराव पाटील, माजी न्यायाधीश जे. टी. देसले, किशोर ढमाले, केशव बहाळकर, बाबा हातेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अनिल दामोदर, प्राचार्य संजीव गिरासे, प्राचार्य डॉ. मधुकर वानखेडे, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, प्रा. डॉ. शशिकला पवार, शकुंतला बोरसे, कलावती माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश महाले यांच्या लोभी मामांस्ना परलोभी पोरी आणि वनमाला पाटील यांच्या पांझरा नदीन्या थडीकाठन्या कविता या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
प्रा. डॉ. मुलाटे म्हणाले, मराठीचा अभ्यासक असूनही अहिराणी बोलता येत नाही ही खंत आहे. भाषा हे मनातले माध्यम असावे. समज, काही गैरसमज असू शकतात, पण आपल्या आईची भाषा हीच खरी भाषा असते. पण, आम्ही तिला आज विसरत आहोत. अनेक भाषांची जननी म्हणून संस्कृतकडे पाहण्यात येते, मुळात हे चुकीचे आहे. भाषा कोणतीही असू देत, शेवटी माणसं महत्त्वाची आहेत. पण, आज माणसांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संवाद हेच प्रभावी माध्यम आहे. पाठ्यपुस्तक ही त्या त्या भाषेतून यायला हवी. अभ्यासक्रमात अहिराणी भाषेचा समावेश असावा आणि यासाठी सर्वांचे सामूहिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे, असे झाल्यास संमेलानाचे हे यश ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.