बौद्धिक संपदा सुरक्षित करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:57 AM2019-03-31T11:57:28+5:302019-03-31T11:58:35+5:30
बौद्धिक संपदा हक्क विषयावर कार्यशाळा : निलेश पंडीत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
धुळे : आपल्या बौद्धिक संपदा सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन पुणे येथील निलेश पंडित यांनी येथे केले.
शहरातील झेड.बी.पाटील महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता कक्ष व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बौद्धिक संपदा हक्क’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी ‘बौद्धिक संपदा हक्क परिचय आणि अंतरदृष्टी’ विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन प्रा.सुधीर पाटील होते. यावेळी संचालिका डॉ.निलिमा पाटील, प्राचार्य डॉ. पी.एच.पवार, डॉ. शशिकांत बागडे, शिरपूर, उपप्राचार्य डॉ. ए.ए.पाटील, उपप्राचार्य डॉ. चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील उपस्थित होते.
निलेश पंडित पुढे म्हणाले की भारतीय विद्यार्थी, संशोधक हे संशोधनात पुढे आहेत. त्यांचे संशोधन जगाच्या संशोधनापेक्षा वेगळे व उपयोगी आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत ते आपल्या संशोधनाचे पेटेंट मिळवित नाही. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून इतर देश पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. खासकरून युवा संशोधकांनी आपल्या संशोधनाचे पेटंट घेण्यासाठी जागृत रहावे.
डॉ.शशिकांत बागडे यांनी ‘बौद्धिक संपदा हक्क क्षेत्रातील निरंतर शिक्षण आणि करियरची शक्यता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की कुठलीही आणि कुणाचीही निर्मिती ही त्याची वैयक्तिक संपत्ती मानून त्याचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी परवानगी घेणे, नामनिर्देश अथवा किंमत मोजून वापरणे आवश्यक आहे, याची जागृती बौद्धिक संपदा हक्कांमधून केली जाते .
अध्यक्ष प्रा.सुधीर पाटील म्हणाले की राष्ट्रीय स्तरावर ‘बौद्धिक संपदा हक्क’ जागृती होणे गरजेचे असल्याचे सांगून यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्र, विद्यापीठ व महाविद्यालय यासर्व स्तरावर सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एच.पवार यांनी केले. तर समन्वयक प्रा.डॉ.पी. आर.चौधरी यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.वर्षा पाटील यांनी कु.गायत्री नवसारे हिने आभार मानलेत. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.टी.जे. पाटील, डॉ. एम. डी.महानुभाव, डॉ. पी. के.पाटील, डॉ. आर.डी. शेलार, डॉ. आर. पी. बोराळे, प्रा.गिरीश देसले, प्रा. राकेश देवरे, डॉ.दिपक नगराळे, प्रा. प्रितेश जैन,प्रा. मनोज बच्छाव यांचे सहकार्य लाभले.