धुळे विभागातून आंतरराज्य बससेवेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:26 PM2020-09-14T12:26:05+5:302020-09-14T12:26:37+5:30
मध्यप्रदेशसाठी अद्याप बसेस सुरू झालेल्या नाहीत
आॅनलाइन लोकमत
धुळे: आंतरजिल्हा पाठोपाठ आता आंतरराज्य बससेवा सुरू करण्यास एस.टी.महामंडळाने हिरवा कंदिल दिला असून, १४ सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्वावर सुरतसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमिवर दक्षता म्हणून मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून येणाऱ्या बससेवा २० मार्चपासून बंद झालेली होती. त्यानंतर धुळे आगारातून मध्यप्रदेश व गुजरातमध्ये जाणारी बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र २३ मार्चपासून देशातच लॉकडाऊन सुरू झाल्याने, सर्व मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली होती.
त्यानंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात २० मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली होती. मात्र या बससेवेला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. तर २० आॅगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. ई-पास शिवाय सुरू झालेल्या या बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका बसमध्ये २२ प्रवाशी बसवले जात आहे.
आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्याच्या २४ दिवसानंतर आता आंतरराज्य बससेवा सुरू करण्यास एस.टी. महामंडळाने परवानगी दिलेली आहे.धुळे विभागातून १४ रोजी गुजरातमधील सुरतसाठी बससेवा सुरू करण्यात आली. पहिली बस दोंडाईचा आगारातून सकाळी ६.३० वाजता सुरतसाठी सुटली. ही बस अक्कलकुवामार्गे जाईल. दुसरी बस शिरपूर आगारातून सकाळी ७ वाजता सुटेल. ही बस शिंदखेडा मार्गे जाईल. तर सकाळी ८ वाजता धुळे-सुरत ही बस सुटेल ही बस साक्री, नवापूरमार्गे सुरतला जाणार आहे. पहिल्याटप्यात सुरतसाठीच बस आहे.दरम्यान प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो याचा आढावा घेतल्यानंतर पुढील आठवड्यापासून विभागातून वापी, बडोदा, अहमदाबाद, अंकलेश्वर या मार्गावर बसेस सोडण्यात येणार आहे. गुजरातसाठी बससेवा सुरू झाली तरी मध्यप्रदेशसाठी अद्याप बसेस सुरू झालेल्या नाहीत.