धुळे जिल्हा परिषदेत ४० अनुकंपधारकांच्या घेतल्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:44 AM2020-09-30T11:44:49+5:302020-09-30T11:44:59+5:30
शैक्षणिक अहर्तेनुसार विविध विभागांमध्ये दिली जाणार नियुक्ती
आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेत असलेल्या रिक्त जागांवर अनुकंपधारकांना सामावून घेण्यासाठी ४० अनुकंपधारकांच्या मंगळवारी मुलाखती घेण्यात येऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले. दरम्यान नियुक्तीपत्रासाठी अनुकंपाधारक सायंकाळपर्यंत थांबलेले होते. मात्र बुधवारी नियुक्तीपत्र देण्यात येतील असे त्यांना सांगण्यात आले.
धुळे जिलह्यातील अनुकंपाधारक गेल्या ८- ते १० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. वित्त विभागाच्या ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध आहे, आणि ज्या पदाच्या भरतीवर निर्बंध नाहीत अशा सरळसेवेच्या कोट्यातील सर्व पदांच्या बाबतीत गट-क व गट-ड मधील प्रतीवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या २० टक्के पदे ही अनुकंपाधारकांना देण्याचे शासनाचे आदेश आहेत. दरम्यान ग्रामविकास विभागाच्या ४ फेब्रुवारी २०२०च्या पत्रानुसार अनुकंपाधारकांना ४५ दिवसाच्या आत नियुक्ती देण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे ही नियुक्तीप्रक्रिया बरीच लांबली.
दरम्यान अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र देण्यात यावीत या मागणीसाठी १६ सप्टेेंबर रोजी अनुकंपधारकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली होती. यापैकी काहींनी सीईओंना भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भेट होऊ शकली नव्हती. दरम्यान आज जिल्हा परिषदेत ४० अनुकंंपधारकांना मुलाखत व समुपदेशनासाठी बोलविण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अतिरक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांनी अनुकंपधारकांची मुलाखत व कागद पत्रांची पडताळणी केली. यावेळी या अनुकंपधारकांना शैक्षणिक अहर्तनुसार जिल्ह्यात असलेल्या रिक्त जागा स्क्रीनवर दाखविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अनुकंपाधारकांमुळे जिल्हा परिषदेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.