नवीन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:08 PM2019-04-12T22:08:35+5:302019-04-12T22:09:20+5:30
मौजे कुसुंबा येथील ग्रामस्थांची मागणी : जिल्हा प्रशासन, जि.प. अधिकाऱ्यांना दिले निवेदन
धुळे : तालुक्यातील मौजे कुसुंबा येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्यात येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. हा प्रश्न येत्या ४-५ दिवसात न सुटल्यास ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करतील असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कुसुंबा येथे २००६-०७ मध्ये नवीन पाईप लाईन नळ पाणी पुरवठा योजना सुमारे ७० लाख रूपये करून करण्यात आली. नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी व राबविण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली नाही. ही योजना मंजूर करण्यासाठी बनावट ठराव करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कुसुंबा गावाची रचना चौरस पद्धतीने अभियंता सर विश्वेश्वरैय्या यांनी आखणी केलेली आहे. गावात सात गल्ल्या आहेत.
नवीन नळ पाणी पुरवठा योजना गावाच्या पुढील गल्लीतून करणे योग्य नव्हते. तांत्रिकदृट्या चुकीच्या पद्धतीने ही पाईपलाइन केलेली आहे. ही पाईपलाईन ठिकठिकाणी फुटून पाणी वाहून जाते. तसेच बांधलेला जलकुंभ १२ वर्षांपासून रिकामा आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या गावात दहा दिवसानंतर पाणी येत आहे. दुष्काळीस्थितीत नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत असल्याने, गावातील ग्रामस्थांना पूरेसे पाणी मिळत नाही.
जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने गावात येऊन या योजनेची पहाणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून, निवेदन प्रशासनाला निवेदन दिले.
निवेदनावर जयश्री पवार, रत्ना परदेशी, सुरेखा पवार, मंदाबाई परदेशी, अनिता परदेशी, रेणुकाबाई परदेशी, यमुनाबाई परदेशी, कुसुमबाई परदेशी, शुभांगी परदेशी, सुनीता परदेशी, मंगलाबाई परदेशी, मीराबाई परदेशी यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.