'आयआरसीटीची' वेबसाईट बंद! मध्य रेल्वेने ३० ठिकाणी सुरू केल्या अतिरिक्त तिकीट खिडक्या
By सचिन देव | Published: July 25, 2023 06:21 PM2023-07-25T18:21:13+5:302023-07-25T18:21:19+5:30
भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीची वेबसाइट मंगळवारी पहाटे तीन पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने, ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती.
धुळे: भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीची वेबसाइट मंगळवारी पहाटे तीन पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने, ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी मंगळवारी सकाळपासून राज्यातील विविध स्टेशनवर एकूण ३० अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू केल्या होत्या. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली. तसेच बंद झालेली आयआरसीटीसीची वेबसाईट मंगळवारी दुपारी १ वाजुन २८ मिनिटांनी पुर्ववत झाली असून, वेबसाईटचे तांत्रिक कारण हे दिल्लीत उद्भवले असल्याचेही डॉ. मानसपुरे यांनी सांगितले.
आयआरसीटीचीच्या वेबसाइट आणि ॲपवरून ७० टक्के प्रवासी ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्याला प्राधान्य देत असतात. यामुळे प्रवाशांचा रांगेत उभे राहण्याचा मोठा वेळ वाचत असतो. मात्र, मंगळवारी पहाटे २ वाजुन ५६ मिनिटांनी आयआरसीटीसीची वेबसाईटच बंद पडली होती. तांत्रिक बिघाडामुळे वेबसाईट बंद पडल्याने प्रवाशांचे तिकीट बुकिंग करणे बंद झाले होते. या प्रकाराची माहिती मिळतात मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सकाळी सातपासून मुंबई, पुणे, नाशिक, नागपुर, सोलापुर, जळगाव, अकोला या सर्व ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्याचे आदेश देऊन, तात्काळ या तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या होत्या. मंगळवारी दुपार पर्यंतदेखील वेबसाईट सुरू न झाल्यामुळे, भुसावळ, जळगाव, नाशिक या ठिकाणच्या स्टेशनवरील खिडक्यांवर प्रवाशांंची गर्दी वाढतांना दिसून आली.
तब्बल साडे दहा तासांनी सुरू झाली वेबसाईट...
सोमवारी पहाटे २ वाजुन ५६ मिनिटांनी बंद झालेली आयआरसीटीसीची वेबसाईट, मंगळवारी दुपारी १ वाजुन २८ मिनिटांनी म्हणजे तब्बल साडे दहा तासांंनी ही वेबसाईट सुरू झाली. दरम्यान, आयआरसीटीसीने देखील तांंत्रिक कारणामुळे वेबसाईट बंद पडल्याचे ट्वीटर वरून जाहिर केले होते. तसेच गैरसोय दुर करण्यासाठी
प्रवाशांना अमेझॉन, मेक माय ट्रीप, या वरून तिकीट काढण्याचे आवाहन केले होते.
आयआरसीटीची वेबसाईट बंद पडल्यानंतर, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नाशिक, अकोला, भुसावळ यासह इतर स्टेशन मिळून ३० ठिकाणी अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू केल्या होत्या. वेबसाईट बंदच्या काळात ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या उत्पन्नावर फारसा परिणाम झाला नाही. बंद झालेली वेबसाईट मंगळवारी दुपारी सुरू झाली. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.