भरधाव दुचाकी घसरून इसमाचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारातील घटना
By देवेंद्र पाठक | Published: June 18, 2023 05:29 PM2023-06-18T17:29:05+5:302023-06-18T17:29:16+5:30
याप्रकरणी शनिवारी दुपारी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
धुळे : भरधाव दुचाकी चालवत असताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. यात सुरेंद्र पाटील (वय ५१) यांच्या डोक्याला आणि अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील अर्थे गावात २४ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी शनिवारी दुपारी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
शिरपूर शहादा रस्त्यावर शिरपूर तालुक्यातील अर्थे गाव शिवारात सलीम लोटन खाटीक यांच्या शेताच्या समोरील भागातून एमएच १८ आर ४३४६ क्रमांकाची दुचाकी घेऊन सुरेंद्र देवीदास पाटील (वय ५१, रा. अर्थे ता. शिरपूर) हे जात होते. त्यांची दुचाकी ही वेगात होती. त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते दुचाकीसह फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य ठिकाणी गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची ही घटना २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर मोठा आवाज होताच परिसरातील लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंद्रकांत युवराज पाटील (वय ४१, रा. अर्थे, ता. शिरपूर) यांनी शनिवारी शिरपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मयत दुचाकी चालक सुरेंद्र देवीदास पाटील (वय ५१, रा. अर्थे, ता. शिरपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक कुंदन पवार घटनेचा तपास करीत आहेत.