शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती नसावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:48 AM2019-06-20T11:48:50+5:302019-06-20T11:49:11+5:30
महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेना : तहसीलदार गणेश ठाकूर यांना दिले निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे : शहरातील काही शाळा विद्यार्थ्यांना ठराविक दुकानातूनच शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदीची सक्ती करीत आहेत. शैक्षणिक वस्तू खरेदीसाठी पालकांना ठराविक दुकानांची सक्ती करू नये अशा मागणीचे निवेदन महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज धुळे तहसीलदार गणेश ठाकूर यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असून, काही शाळा ठराविक दुकानातूनच गणवेश व इतर वस्तू खरेदी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
अनेक विद्यालयांमध्ये पूर्व परवानगी न घेता तात्पुरते स्टॉल लावून पुस्तक व शालेय साहित्याची विक्री केली जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
पालकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने २ मे १६ रोजी परिपत्रक काढून शालेय गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य हे शाळेतून अथवा ठराविक दुकानातून घेण्याची सक्ती करू नये असे आदेश दिलेले आहेत. असे असतांनाही काही शाळांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातून खरेदीची सक्ती करू नये असे आदेश द्यावेत अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रसाद देशमुख,हर्षल परदेशी, गौरव गीते, यश शर्मा, गुरूराज पाटील, राहूल मराठे, विठ्ंल पगारे, तुषार हरणे, समाधान पाटील, देविदास चौधरी आदी उपस्थित होते.