श्रावणसरींचा झाला दमदार वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:39 PM2020-08-14T12:39:52+5:302020-08-14T12:40:10+5:30
धुळे जिल्हा : दिवसभर सूर्याचे दर्शन झालेले नाही, पावसामुळे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठेत नेहमीपेक्षा गर्दी कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :शहरासह जिल्ह्यात गुरूवारी दमदार श्रावणसरींचा वर्षाव झाला.दिवसभर सुरू राहिलेल्या रिपरिप पावसामुळे शहरासह जिल्हावासिय ओलेचिंब झाले. बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर असा पाऊस झाल्याने नागरिक समाधानी झाले आहेत.
शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. रात्रीही पाऊस झाला. तर गुरूवारची पहाट पावसानेच उगवली. सकाळपासून थोड्या-थोड्या अंतराने पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी कार्यालयात जाण्याच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्याने कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. सुमारे अर्धातास झालेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढतांना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. तर पादचाºयांना या पाण्यातून मार्गक्रमण करण्यावाचून पर्याय राहिला नव्हता. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांनीही दुकानांचा आसरा घेत पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
रस्त्याचे तीनतेरा
दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच येथील छोट्यापुलावर डांबरीकरण करण्यात आलेले होते. मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे या पुलावरील डांबर उखडलेले आहे. त्यामुळे पुलावर जागोजागी खड्डे पडले असून, यातून मार्ग काढतांनाही चालकांना कसरत करावी लागत होती.
धुळे तालुक्यातील नेर गावातही दमदार पाऊस झालेला आहे. तिसगाव ढंढाणे परिसरातही पाऊस होता.
तर शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात १२ आॅगस्ट रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळ पासुन संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. येथील नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती ती या पावसामुळे काहीशी पूर्ण झाली.
दरम्यान दोंडाईचा शहरातही गुरूवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवला. नेहमीपेक्षा बाजारात गर्दी कमी होती.
साक्री, पिंपळनेर या परिसरातही कधी रिपरिप तर कधी दमदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.
श्रावण महिन्यात होत असलेल्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. पोळ्यापूर्वीच होत असलेल्या पावसामुळे शेतकरीवर्ग समाधानी आहे.