कोरोनासाठी ते दवाखाने अधिग्रहित करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 08:59 PM2020-05-06T20:59:48+5:302020-05-06T21:41:16+5:30
आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी : प्रभाग चार मधील खाजगी दवाखान्यांना विरोध
धुळे : येथील देवपूर भागातील प्रभाग चार हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित, संशयित तसेच अन्य आजाराने ग्रस्त रुग्णांवर वैद्यकीय उपचार होण्यासाठी महापालिकाकडून येथील हॉस्पिटल अधिग्रहित केले आहे़ प्रभागाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात व दाटवस्तीचा असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ प्रशासनाकडून सदरील हॉस्पिटल अधिग्रहन करू नये अशा मागणीचे निवेदन नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी आयुक्त अजिज शेख यांना दिले़
या प्रभागात शाळा, महाविद्यालयासह नेहरू नगर, पंचवटी, रमाबाई आंबेडकर नगर, चंदन नगर, विष्णू नगर, जयहिंद कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, गरुड कॉलनी, आनंद नगर, मयूर कॉलनी, उष:काल नगर, डॉ बाबा साहेब आंबेडकर नगराचा समावेश आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी दिलेल्या दिशानिदेर्शानुसार नागरिक काटेकोर पालन करीत आहे. प्रभाग क्र ४ च्या परिसरात सुदैवाने अद्याप एक हि कोरोना बाधित रुग्ण नाही. सदर प्रभागात चार ते पाच नामांकित हॉस्पिटल आहेत. प्रशासनाकडून यापैकी काही हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित तथा कोरोना सदृश्य रुग्ण अधिग्रहित करीत आहे.
दोन दिवसांपासून सदर भागातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सदर परिसर दाट वस्तीमध्ये आहे तसेच प्रभागातील हॉस्पिटल अधिग्रहित झाल्यास कोरोना बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक,वाहन, रिक्षा चालकांच्या संपकामुळे लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ प्रभाग ४ मधील हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित किवा सद्दृष्य रुग्ण आयसोलेट करण्यासाठी वापरू नये. याकरिता परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. सदर निर्णय स्थगित करून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हील हॉस्पिटल तसेच जवाहर हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करावी अशी मागणी नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी निवेदनाव्दारे केली आहे़