धुळे येथे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:54 AM2019-12-11T11:54:17+5:302019-12-11T11:54:37+5:30
एका विषयात सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण, निकालाबाबत अद्याप निर्णय नाही
आॅनलाइन लोकमत
धुळे :औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आॅपरेटर अॅडव्हान्स मिशन टुल्स या विषयात सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, याबाबत प्राचार्यांना निवेदन देवूनही कुठलाही निर्णय न झाल्याने, आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी ठिय्या आंदोलन करून महाविद्यालय बंद पाडले होते.मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
आॅपरेटर एडव्हान्स मिशन टुल्स या विषयाचा थेअरी पेपर गेल्या महिन्यात झाला होता. हा पेपर आॅनलाइन घेण्यात आला होता. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्वच्या सर्व म्हणजे १५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयटीआयच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र निकालाबाबत कुठलीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १० वाजेच्या सुमारास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेरच ठिय्या मांडून प्रवेशद्वार बंद केले होते. तसेच आयटीआय कॉलेज बंद केले होते. पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने, विद्यार्थ्यांनी तूर्त आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान निकालात झालेल्या चुकीबद्दल वरिष्ठांना कळविले असल्याचे प्राचार्य एम.के.पाटील यांनी सांगितले.