आयटीआयची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:03 PM2020-09-10T12:03:04+5:302020-09-10T12:03:44+5:30
दुसरी यादी १७ रोजी जाहीर होणार
आॅनलाइन लोकमत
धुळे :डिप्लोमाबरोबरच आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे.आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, यात इलेक्ट्रीशियन या ट्रेडसाठी खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ७५ टक्यावर बंद झाल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी आयटीआयसाठी प्रवेश अर्जाची प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. सुरवातीला १४ आॅगस्टपर्यंत प्रवेश अर्ज करण्याची मुदत होती. त्यानंतर त्याला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आयटीआयने पूर्वी जाहीर केलेले गुणवत्ता यादी जाहीर व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही लांबले आहे.
धुळे जिल्हा आयटीआयच्या २० ट्रेडच्या एकूण १ हजार ६० जागा आहेत. तर ८१ युनिट आहेत.
दरम्यान ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयटीआयची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर ९ पासून पहिली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.
आयटीआयत विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा हा इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, टर्नर, मोटार मॅकेनिक या शाखांमध्ये प्रवेश घेण्याकडे असतो.
खुल्या प्रवर्गात इलेक्ट्रीशियन या शाखेसाठी ९३ टक्यांपासून सुरूवात होत गुणवत्ता यादी ७५ टक्यांवर बंद झाली. फिटरसाठी ९०.३३ टक्यांपासून सुरू होत ६२.१६, टर्नर-८६.१६ पासून सुरू होत ६३.४२, वेल्डरसाठी ८२ पासून सुरू होत ६२.१६, मोटार मॅकेनिक ८८ पासून सुरू होत ५९ तर आरएसी ८५ टक्यांपासून सुरू होत ६३ टक्यांवर बंद झाली आहे. ही फक्त खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी आहे.
पहिल्या फेरीत ५५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया १४ सप्टेंबर रोजी सुरू राहणार असल्याचे उपप्राचार्य जैन यांनी दिली. दरम्यान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.