सराईत गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करा, विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 08:19 PM2023-01-20T20:19:42+5:302023-01-20T20:20:00+5:30
सराईत गुन्हेगारांची दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या जिवीताला धोका होणार नाही
धुळे :
सराईत गुन्हेगारांची दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या जिवीताला धोका होणार नाही यासाठी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत घडणाऱ्या विविध गुन्ह्यांचा निपटारा तातडीने करण्याचेही सांगितले असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक विभागातंर्गत जिल्हानिहाय वार्षिक तपासणी करण्यासाठी शेखर पाटील धुळ्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते.
बी. जी. शेखर पाटील म्हणाले, जिल्ह्याची वार्षिक तपासणी केलेली आहे. त्यात काही सुचना करण्यात आलेल्या आहेत. गुन्ह्यांचा तातडीने निपटारा कसा होईल याकडे अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. निजामपूर, साक्री, शिरपूर, आझादनगर आणि चाळीसगाव रोड पाेलिस ठाण्यात भेट दिली. संवेदनशील भागात देखील भेट देऊन आढावा घेतलेला आहे. ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत त्या ठिकाणी काय उपाय करत येईल याकडे लक्ष दिले जाईल. महिला आणि मुली यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने त्याकडेही लक्ष दिले जाईल. गुन्ह्यांचा तातडीने निपटारा झाला पाहीजे याबाबत देखील सुचना करण्यात आलेल्या आहेत. जनता आणि पोलिस यांचा संवाद मोठ्या प्रमाणावर कसा होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे. ई-टपाल सेवा सुरु करत असल्याने त्याचे प्रात्याक्षिक घेण्यात आले आहे. ही सुविधा ऑनलाईन असल्याने अर्जाबाबत संपुर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. गांजा, भांग याचे समुळ नष्ट करण्याकडेही आमचा भर असेल.