जळगावचा व्यापारी दागिन्यांसह जेरबंद तिघा चोरट्यांचाही मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 07:31 PM2020-10-09T19:31:43+5:302020-10-09T19:32:07+5:30
शिरपूर परिसरातील चोरी उघड : ४ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त
धुळे : शिरपूरसह परिसरात चोरी केल्यानंतर लपून बसणे, वारंवार ठिकाण बदलणे यामुळे चोरटे पोलिसांना सापडत नव्हते़ अशातच धुळ्यानजिक तिखी तलावाजवळ तीन जण लपून बसले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या़ त्याचवेळेस चोरीचे सोने विकत घेऊन जळगावच्या दिशेने निघालेल्या व्यापाऱ्याला पारोळा चौफुलीवर पकडण्यात पोलिसांना यश आले़ त्यांच्याकडून ४ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले़
मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील मोहाला येथील काही लोकं धुळे जिल्ह्यातील शेतावर जागल्याचे काम करतात़ त्यांच्याकडे त्यांचे काही नातेवाईक पाहुणे म्हणून येतात, चोरी करुन निघून जातात़ मोहाला येथील दोघांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने शिरपूर तालुक्यातील करवंद, वाघाडी आणि अर्थे गावात घरफोडी केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली़ पण, चोरट्यांना सुगावा लागल्याने ते पळून जाण्यात यशस्वी ठरले़ धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथील एक शेताजवळील तिखी तलावालगत तीन जण लपून बसल्याची माहिती बुधवंत यांना मिळताच त्यांच्यासह उपनिरीक्षक हनुमान उगले, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, रफिक पठाण, श्रीकांत पाटील, महेंद्र कापुरे, कर्मचारी प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, उमेश पाटील, रविकिरण राठोड, विशाल पाटील, किशोर पाटील, तुषार पारधी, मयूर पाटील, योगेश जगताप, दीपक पाटील, कैलास महाजन यांनी सापळा लावून पाठलाग करुन तिघांच्या मुसक्या आवळल्या़ पोलिसांनी जतन रुमसिंग मोरे (२१), कुंवरसिंग सुरसिंग मोरे (२२) आणि लालसिंग रेन्या तडवी (२०) (तिघेही रा़ मोहाला ता़ सेंधवा जि़ बडवानी) यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच दागिने, मोटारसायकल काढून दिले आहे़ त्यांनी चोरीचे सोने हे सोनू उर्फ जितेंद्र अशोक सोनार (३०, रा़ मेहरुण, ता़ जळगाव) याला विकल्याचे सांगितले़ त्याचा शोध घेतला असता पारोळा चौफुलीवरच पकडण्यात आले़ त्याच्याकडून ४ लाख ८७ हजार ५२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
२०१८ मध्ये धुळे तालुक्यातील नेर येथे जैन मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला होता़ ही चोरी केल्याची कबुली संशयित जतन रुमसिंग मोरे याने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली़ दरम्यान, पकडण्यात आलेल्या चौघा आरोपींना शिरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़