महिलेच्या पर्समधून अडीच लाखांचे दागिने लंपास, धुळे बसस्थानकातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 05:23 PM2023-05-30T17:23:28+5:302023-05-30T17:26:12+5:30
बसस्थानकातील पोलिस नेमके काय करतात, असा प्रश्न या वाढत्या चोऱ्यांमुळे निर्माण झाला आहे. वारंवार महिला प्रवाश्यांना टारगेट करुन दागिने चोरले जात आहे.
राजेंद्र शर्मा
धुळे : धुळ्यातील बसस्थानकात महिला प्रवाश्यांचे दागिने चोरुन नेण्याचे प्रकार थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कल्याण येथील महिला प्रवाश्याच्या बॅगमधून २ लाख २८ हजार रुपयांचे दागिने हातोहात लंपास करण्यात आले. ही घटना लक्षात येताच महिला प्रवाश्यांसह नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
देवयानी देविदास पाटील (रा. अंबिवली, पश्चिम कल्याण जि. ठाणे) यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सोमवारी दुपारी ३ वाजता देवयानी पाटील या धुळे शहर बसस्थानकातील फलाट क्रमांक २ येथील सिमेंट बाकड्यावर बसलेल्या असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्याकडील ५० ग्रॅम वजनाची मंगलपोत, तसेच एक नेकलेस असा २ लाख २८ रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी शहर पोलिसात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बसस्थानकातील पोलिस नेमके काय करतात, असा प्रश्न या वाढत्या चोऱ्यांमुळे निर्माण झाला आहे. वारंवार महिला प्रवाश्यांना टारगेट करुन दागिने चोरले जात आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालून वाढणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.