भरधाव ट्रकने चिरडल्याने पत्रकार तरुणाचा जागीच मृत्यू; दोन बाईक्सचाही चुराडा, आरोपींना अटक!

By देवेंद्र पाठक | Published: July 29, 2024 11:19 PM2024-07-29T23:19:20+5:302024-07-29T23:20:41+5:30

धुळ्यात शिरलेल्या सुपारीच्या ट्रकला मनोहर टॉकीजजवळ पकडले, चालक, सहचालक ताब्यात.

Journalist died on the spot after being crushed by a speeding truck The accused were arrested | भरधाव ट्रकने चिरडल्याने पत्रकार तरुणाचा जागीच मृत्यू; दोन बाईक्सचाही चुराडा, आरोपींना अटक!

भरधाव ट्रकने चिरडल्याने पत्रकार तरुणाचा जागीच मृत्यू; दोन बाईक्सचाही चुराडा, आरोपींना अटक!

धुळे : कर्नाटक राज्यातून सुपारी भरुन मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथे जात असलेल्या भरधाव ट्रकने गरताडबारीजवळ साेमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका कारला मागून धडक दिली. कारमधील तरुणाने घाबरुन बाहेर उडी मारली आणि तो ट्रकच्या पुढच्या चाकात आला आणि चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचे  नाव  हर्षल  भदाणे (२७) असे  असून तो मुंबईत टी.व्ही.चॅनलमध्ये रिपोर्टरचे काम करीत होता.  

तरुणाला चिरडल्यानंतर ट्रक भरधाव वेगाने मालेगाव रोडने धुळे शहरात दाखल झाला. त्याने रस्त्यात येणाऱ्या दोन मोटारसायकलचा ही चुराडा केला. मनोहर चित्रपट गृहाजवळ आल्यावर ट्रक हा त्याठिकाणी सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी घुसला आणि तेथे थांबला. तेव्हा त्याठिकाणी उपस्थित संतप्त जमावाने पळून जाणाऱ्या चालक व सहचालकाला पकडून मारहाण केली  आणि ट्रकवर दगडफेक केली. दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ट्रक चालक व सहचालक मद्यप्राशन केलेले होते. दरम्यान, चालक, सहचालक शहर पोलिसांच्या ताब्यात आहे.  

कर्नाटक राज्यातून मध्यप्रदेश राज्यातील इंदूुर येथे एमपी ०९ एचएच १६४६ क्रमांकाचा ट्रक सुपारी घेऊन जात होता. ट्रक चालक दीपक डोडवे (वय ४०) आणि सहचालक उमेश मनडेला (वय २५) या दोघांनी मद्यप्राशन केलेले होते. चालक मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने ट्रक चालवित असल्याने  गरताडबारीजवळ त्याने एम.एच.१८ बीएक्स२९२०  कारला धडक दिली. अचानक मागून धडक बसल्याने कारमधील मुंबई येथील टीव्ही चॅनलला काम करणारा हर्षल कैलास भदाणे या तरुण पत्रकाराने गाडीतून बाहेर उडी मारली. त्यामुळे तो सुसाट वेगात असलेल्या ट्रकच्या पुढच्या चाकात आल्याने तो चिरडला गेला आणि जागीच गतप्राण झाला. नंतर  ट्रक सुसाट असल्याने लहान मोठ्या अनेक वाहनांना धडक देत महामार्गाऐवजी ट्रक धुळ्यात शिरला.

मनोहर टॉकीजजवळ पकडले

ट्रकच्या मागे गरताड येथील नागरिक असल्याने ते पाहून ट्रकला पकडण्यासाठी अनेकांनी धाव घेतली. यात दुचाकी, चारचाकी अनेक वाहनांना ट्रकने अक्षरश: चिरडले. यात एका पोलिस कर्मचारीसह दोन जणांना गंभीर दुखापत झाली. मनोहर टाकीजजवळ ट्रक पकडण्यात आला. संतप्त जमाव लक्षात घेता चालक, सहचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न करताच नागरिकांनी त्यांना पकडले.

पोलिस दाखल, गर्दी पांगविली

घटनेची माहिती मोहाडी पोलिसांकडून शहर पोलिसांना कळविण्यात आल्याने घटनेचे गांभिर्य ओळखून शहर पोलिसांनी मनोहर टॉकीजजवळ जावून ट्रक ताब्यात घेतला. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. चालक आणि सहचालकाला शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तणाव कायम असल्याने शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

Web Title: Journalist died on the spot after being crushed by a speeding truck The accused were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.