बिहारी मजुरांचा पायी प्रवास शिंदखेड्यात रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 09:25 PM2020-04-17T21:25:52+5:302020-04-17T21:26:18+5:30
तपासणीअंती कोरोना ‘निगेटीव्ह’ : १४ दिवसांसाठी केले क्वारंटाईन, सर्व सोयी उपलब्ध
शिंदखेडा : सुरत येथून रेल्वे ट्रॅकच्या माध्यमातून बिहारी मजुरांनी हिम्मत करीत उपाशी पायी प्रवास केल्याची घटना शिंदखेड्यात आल्यानंतर लक्षात आली़ तातडीने त्यांना शिंदखेडा येथील रेल्वे कर्मचारी राहुल मराठे आणि तहसीलदारांमुळे त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली़
येथील रेल्वेस्टेशनवर सकाळी ८ वाजेच्या सुमारास अत्यंत दयनीय अवस्थेत पायी १८ ते ३० वयोगटातील बिहार येथील १४ तरुण मजूर अत्यंत दयनीय अवस्थेत येऊन प्लॅटफॉर्मवर बसले होते़ रेल्वे कर्मचारी राहुल मराठे यांच्या लक्षात ही बाब आली़ त्यांनी प्राथमिक चौकशी केली असता त्यांना काहीएक माहिती देता येत नव्हती़ त्यांची विचारपूस केली असता ते सुरत येथे एका कंपनीत कामाला होते़ मात्र लॉकडाउनमुळे कंपनी बंद पडली व त्यांना तेथून जाण्यास सांगितले़ त्यांनी कसे बसे भाड्याच्या घरात काही दिवस काढले व घरमालकांनीही ११ एप्रिल रोजी घरातून काढून दिल्याने त्यांनी बिहारमध्ये पायी जाण्याचा निर्णय केला व १२ तारखेपासून रेल्वे ट्रॅकने पायी शुक्रवारी सहाव्या दिवशी शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर पोहचले़ या बाबत मराठे यांनी चौकशी केली असता ते पाच दिवसापासून उपाशी असून चालून चालून पाय ही सुजले होते़ शिवाय ते खूप घाबरले होते़ त्यांना कोणी मारेल आणि पोलिसांकडे देतील, अशी भीती त्यांच्या मनात होती़ मात्र मराठे यांनी त्यांची सर्व कहाणी ऐकून सर्व मजूर बिहार राज्याचे असल्याने खासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्याशी संपर्क साधला़ डॉ़ भामरे यांनी शिंदखेडा तहसीलदार यांना सर्व सांगितले असता तहसीलदार साहेबराव सोनवणे लगेच सहकाऱ्यांसह शिंदखेडा रेल्वेस्टेशनवर पोहचले़ सर्व मजुरांना एका खासगी वाहनाने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना कोरोनाची कोणतीच प्राथमिक लक्षणे नसल्याने त्यांना १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या देखरेख खाली जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक ५ मध्ये ४ खोलीत राहण्याची, झोपण्याची व जेवणाची व आंघोळीची सर्व सोय करुन दिल्यामुळे सर्व मजूर समाधानी दिसून आले़ दरम्यान, तहसीलदार यांनी याठिकाणी २ शिक्षकांना नियुक्त केलेले आहे़
तहसीलदार सोनवणे यांनी तरुण मजुरांच्या राहण्यासह खाण्या-पिण्याची सोय करुन दिल्यामुळे सर्वांच्या डोळ्यात पाणी आले़ तुम्ही सांगाल तितके दिवस आनंदाने राहू अशी ग्वाही त्यांनी दिली़