माजी उपसरपंचासह दोन्ही ग्रामसेवकांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:59 PM2019-04-05T22:59:23+5:302019-04-05T22:59:55+5:30
शिरपूर : थाळनेर ग्रामपंचायत अपहार प्रकरण
शिरपूर : तालुक्यातील थाळनेर येथील ग्रामपंचायतीत लाखो रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजी सरपंचांचे पती तथा शिसाकाचे माजी व्हाईस चेअरमन एकनाथ जमादार यांच्यासह तत्कालीन दोन्ही ग्रामसेवकांना जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती़ पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे ५ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती ए़बी़ जाधव यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़
तत्कालीन सरपंच अरूणाबाई एकनाथ जमादार, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ काशिनाथ जमादार, ग्रा़पं़ सदस्य दिनकर आनंदराव पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजी माधव पवार, ग्रामविकास अधिकारी डी़आऱ बोरसे, पंचायत समिती विस्तार अधिकारी आऱडी़ महिंदळे, तत्कालीन गटविकास अधिकारी भरत कोसोदे अशांनी सन २०१२ ते २०१७ या कालावधीत थाळनेर ग्रामपंचायतीत शासनाकडून विविध विकास कामांसाठी मिळालेल्या ५५ लाख ३ हजार ८४८ रूपयांचा निधीचा संगनमताने अपहार केला होता़ या संदर्भात कुबेरसिंग जयपालसिंग जमादार यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता़
चौकशीअंती ग्रामविकास अधिकारी शिवाजी पवार व आबा बोरसे यांना अटक करण्यात आली होती़ त्यानंतर माजी उपसरपंच एकनाथ जमादार यांनाही अटक करून ५ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते़ ५ रोजी तिघांना शिरपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे तिघांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली़ फिर्यादीतर्फे अॅड़अमित जैन यांनी कामकाज पाहिले़
तत्कालीन महिला सरपंच फरार
४या गुन्ह्यातील तत्कालीन सरपंच अरूणाबाई एकनाथ जमादार व सदस्य दिनकर पाटील हे दोन्ही फरार आहेत़
४या गुन्ह्यातील तत्कालीन गटविकास अधिकारी भरत कोसोदे, ग्रामविस्तार अधिकारी आऱडी़ महिंदळे या दोघांना उच्च न्यायालयाने तर ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़