बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 09:49 PM2018-11-27T21:49:59+5:302018-11-27T21:52:06+5:30
जिल्ह्यातील स्थिती : शिरपूरचा अपवाद, विक्रीसाठी आणलेल्या भुसार शेतमालाची तेवढी खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : केंद्र सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी बाजार कायदा आणत असून त्यामुळे माथाडी कामगार कायदा रद्द होणार असल्याच्या निषेधार्थ राज्य माथाडी कामगार हमाल संघर्ष समिती व चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडने पुकारलेल्या बंदच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील धुळे, दोंडाईचा, साक्री येथे मंगळवारी व्यवहार ठप्प झाले. शिरपूर येथे समितीत शेतकºयांनी शेतमाल विक्रीस आणल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी व्यवहार सुरू ठेवण्यात आले.
दोंडाईचात ६० लाखाची उलाढाल ठप्प
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार हमाल संघर्ष समिती व चेंबर आॅफ असोशिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडने पुकारलेल्या बंदच्या आवाहना नुसार दोंडाईचा येथील हमाल मापाडी कामगार युनियनने बंद पाळला आहे.
त्यामुळे बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. विविध शेतीमालाची सुमारे ६० लाख रुपये किमतीची ३ हजार ५७० क्विंटल आवक आज ठप्प झाल्याची माहिती दोंडाईचा बाजार समिती सूत्रांनी दिली.
सरकार कृषि माल थेट ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी बाजार कायदा आणत आहे. बाजार समितीसाठी हा कायदा महत्त्वाचा असला तरी या कायद्यामुळे माथाडी कायदा रद्द होण्याची भिती आहे. माथाडी कायदा रद्द होण्याच्या हालचालीच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समीत्या आज बंद आहेत. या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथील हमाल मापाडी कामगार यूनियनने बाजार समिती कामकाज बंदबाबत संघटनेचे अध्यक्ष पंडित पाटील, उपाध्यक्ष धुड़कु तिरमलि, सचिव रतन भील, खजिनदार भिका तिरमलि यांनी सोमवारी निवेदन दिले होते.
सुमारे ५०० हमाल मापाडी बंदमध्ये सहभागी आहेत. त्या मुळे दोंडाईचा बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सद्यस्थितीत मका, मिरची, गहु जास्त आवक असते. मका, मिरची, गहु, शेंगा, मुग, हरभरा, ज्वारी, दादर, बाजरी आदि शेतीमालाची सुमारे ६० लाखांची सरासरी आवक ३ हजार ५७० क्विंटल आवक आज ठप्प झाली. मालात उत्पन्नात प्रचंड घट आली असताना बाजार समितीत मंदी होती. त्यातच बंदमुळे बाजार समोतीतीत शुकशुकाट जाणवला
शिरपूरला बंदच्या आवाहनानंतरही शेतमालाची खरेदी
कायद्याविरोधात बाजार समित्या मंगळवारी बंद करण्याचे आवाहन करून सुध्दा काही शेतकºयांनी भुसारमाल विक्रीसाठी आणल्यामुळे त्यांची गैरसोय होवू नये म्हणून त्याचे मोजमाप करण्यात आले़ त्यानिमित्त सुमारे १२ लाखाची उलाढाल झाली़ सद्यस्थितीत माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी असलेला कायदा रद्द करण्याच्या हालचाली सुरू असून त्याच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले होते़ त्यानुसार, येथील मार्केट कमिटी प्रशासनाने सुध्दा बंदच्या आदल्याच दिवशी मार्केट कमिटी मंगळवारी बंदबाबत सूचित केले होते. मात्र काही शेतकºयांना बंद संदर्भात माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणला़ २५-३० वाहनांमधून मका, ज्वारी, बाजरी, शेंगा आदी भुसार माल आला होता़ शेतकºयांनी मार्केट प्रशासनाकडे माल खरेदी करण्याची मागणी केल्यामुळे प्रशासनाने देखील शेतकºयांची गैरसोय होवू नये म्हणून सदरचा माल खरेदी करण्यात आला़
साक्री बाजार समिती बंद: २ कोटींची उलाढाल ठप्प
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज एक दिवसाचा बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर आज साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. या बाजार समितीत सध्या फक्त भुसार मालाची आवक सुरू आहे तर कांद्याची आवक पिंपळनेर बाजार समितीमध्ये होत असते. बाजार समितीचा एक दिवसाच्या संपामुळे जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. बाजार समितीच्या संपामुळे शेतकºयांनी कोणताही माल विक्रीस आणलेला नव्हता