अवघ्या ४८ तासात चोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 09:10 PM2019-06-25T21:10:28+5:302019-06-25T21:10:49+5:30
स्थानिक गुन्हे शाखा : हिरे मेडीकलच्या कॅन्टीनमधील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये चोरी करणाºया चोरट्याला अवघ्या ४८ तासात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले़ चोरीला गेलेल्या मुद्देमालासह चोरट्याला अटक करण्यात आली़
धुळ्यातील चक्करबर्डी येथील बायपास रस्त्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास चोरी करण्यात आली होती़ चोरट्याने कॅन्टीनमध्ये घुसून सोन्याचे मंगळसुत्र, दोन मोबाईल, चॉकलेट आणि सौंदर्य प्रसाधने चोरुन नेली होती़ या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, पोलीस कर्मचारी प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, उमेश पाटील, विलास पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, रवी राठोड यांनी तपासाला सुरुवात केली़
सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन पोलिसांच्या पथकाने त्या चोरट्याचा माग काढला़ आरोपीबद्दल माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून जबीर शहा (रा़ वडजाई रोड, धुळे) याला ताब्यात घेतले़ त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ त्याच्याकडून १३ हजार ५०० आणि १ हजार ५०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल, ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, रोख रक्कम आणि सौंदर्य प्रसाधने असा सर्व मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे़ त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे़